आंबेडकरी साहित्य हे प्रस्थापित पारंपरिक मूल्यांना नकार आणि व्यवस्थेतील विषमता प्रकट करत असल्यामुळे समाजिकतेचे वेगळे परिणाम प्राप्त होते. व माणूसमूल्याचे दिग्दर्शन होते. आंबेडकरी कवितेतून प्रत्येकच कवी आपलं आणि प्रत्येकच माणसाचं माणूसपण टिकविण्यासाठी प्रयत्नशील असतो. आंबेडकरी कवयित्रींनी सुद्धा आपल्या काव्यातून समाजविषयक चिंतन मांडले आहे. सुनंदा बोदिले यांच्या कवितेतूनही त्यांची आंतरिक वेदना त्यांनी मांडली आहे.'माणूस झाड आणि माती' या त्यांच्या काव्यसंग्रहात अमोघ आशय आणि संचत भावनात्मक अभिव्यक्तीचा प्रत्यय येतो.
माणूस, झाड आणि माती ही तिन्ही निसर्गातील निर्मिती तत्वे आहेत. अखिल मानव जातीला जगण्याची, लढण्याची सम्यक कार्य करण्याची शक्ती ह्या मूलभूत निसर्गघटकातून मिळत असते. माणूस, झाड, मातीने मृत्यूचे तत्वज्ञान विषद केले आहे. ह्या तिन्ही घटकांनी माणुसकीची भाषा ही दिली आहे. तसेच कवितेने माणुसकी तारणाऱ्या शास्त्रालाही जन्म दिला. उपद्रवमूल्य जोपासणाऱ्यावर प्रहारही केले. समाजात प्रचंड विषमता रक्तरंजितता असेल तर कविता शब्दातून हिंसक प्रहारही करते. पुरुषप्रधानता ही मनुनिर्मित असल्यामुळे स्त्रीचा जागोजागी छळवाद दिसून येतो. पण तथागत बुद्ध हे स्त्री देह पुरुषाला जन्म देऊन, संवर्धन माया-ममतेने करणारा असल्यामुळे स्त्रीला गौणत्व देणे हे क्रुरपणाचे मानतात. कवयित्रीने देखील स्त्री मनाचा संवेदनशीलतेने शोध घेतला असून स्त्री ही स्वतःला सामावून संघर्षातही इतरांना प्रदीप्त करणारी, झुंज देणारी महाशक्ती असते असे म्हटले आहे. स्त्री आत्मविकासाचा प्रकाश दाखविणारी ऊर्जा असते, असे म्हटले आहे. 'मार्गदाता' या कवितेमध्ये स्त्रीच्या सर्वकष शोषणाविरुद्ध आघाडी उभारून क्रांती करणारा, स्त्री स्वातंत्र्याचा प्रधान प्रवक्ता तथागत गौतम आणि मानव्याला उजागर करणारा, प्रज्ञावान, नीतीमान, शिलवंत युगप्रवर्तक, घटनेचा शिल्पकार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मार्गदाता होते, असे म्हटले आहे. बाबासाहेबांनी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना ज्ञानाची आत्मतेजाची ओळख करून दिली. तिचे आत्मतेज फुलले-
"तिने पुकारले बंड अन्यायाविरुध्द
ती नेत नाही फिर्याद कोणत्याच न्यायालयात
तिला करायची तिची रखवाली
तिचे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी
ती करते आहे निषेध अमानवी कृत्याचा
मानव्याच्या नव्या आविष्कारासाठी"
कवयित्री समग्र पुरुषप्रधान व्यवस्थेला आरोपीच्या पिंज-यात उभे करून अमानवी कृत्याचा जाब विचारते आहे. त्यातून तिला 'अत्त दीप भव' चा नवा आविष्कार घडला. मानवी मूल्यांचा शोध लागला.
रमाई ही महासूर्याची स्फूर्ती, आमची सांस्कृतिक माता, रमाई म्हणजे प्रगाढ समजूतदार कारुण्य, उदंड मानवतेचे प्रतीक. बाबासाहेबांनी जे मानवतेचं सुक्त रचलं नव तत्वज्ञान रचलं त्या तत्वज्ञानाची खरी जननी रमाई त्याग-समर्पणाचं विद्यापीठ रमाई. सुनंदा बोदिले रमाईबद्दल म्हणतात-
"तुझ्या अजरामर वेदनेचे प्रतीक कोरतांना
उभी राहते संघर्षाची गाथा
निष्ठावंत आदर्शाची प्रतिमा घडविणारी
तू महान शिल्पकार होतीस रमाई"
संवेदनशील महासूर्याला घडवतांना रमाईची सर्जन-शीलता आकाशव्यापी उजेडाचाआविष्कार ठरली. क्रांतिमा सावित्रीने या भारतभूमीवर भारतीय मातीवर मनुवादी संस्कृतीने जो स्त्रीचा छळवाद मांडला होता, त्याच मातीवर आपल्या प्रचंड विज्ञाननिष्ठ मानवतावादी संघर्षाने स्त्रियांच्या जखमांना जाणून त्यांच्या विकासासाठी त्यांच्या वाटेवर ज्ञानाची फुले अंथरली. ती माती सुगंधित झाली. क्रांतिमाच्या कर्तृत्वाचा सौरभ अजुनही दशदिशात दरवळतो आहे. सावित्री- रमाईच्या अश्रू-रक्त- घामातून उगवलेल्या ज्ञानप्रकाशाने आज संपूर्ण स्त्रिया शारदीय-चांदण्यात न्हाऊन निघाल्या. सुख समृद्धीच्या वाटेकरू झाल्या वंचित शोषितांच्या उत्थानाची पहाट जिथे उगवेल असे क्षितिज कवयित्रीला हवे आहे. बोधिसत्व बहरावा, पिंपळाची ऊर्जा प्रस्फुटित व्हावी. पिंपवृक्ष सळसळावा. निसर्गतत्वाशी एकरूप होता यावं पृथ्वीवर विषमता - असमानता करणारे वाद नष्ट व्हावे म्हणून बोधिवृक्षाची सळसळणारी मानुष ऊर्जा मानवजातीच्या शरीरात भरण्यासाठी कवयित्री म्हणते की,
"माणूस -झाड आणि माती
मूळ -जात -नाती
निर्व्याजपणे टिपलेले मोती
मातीतच उगवणार" मनुष्यत्व निर्माण करण्यासाठी नवा इतिहास घडविणे आवश्यक असते त्याची फलभूमी म्हणजे-
"नवांकुर जन्म घेईल
तो बोधिवृक्ष होईल
आपण त्याच्या छायेत
समतेचं गीत गाऊ"
मानवजातीला 'बहुजनहिताय, बहुजनसुखाय' हया कुल्याणकारी तत्वज्ञानाचा लाभ व्हावा. अहंकार स्वार्थ- वर्चस्व घृणा लोभ याचा नायनाट हावा ही सदिच्छा हा कवितेचा गाभा आहे. बुद्धाचे धम्म तत्वज्ञान म. फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म, कबिराचे समाधिष्ठित तत्वज्ञान याचा भक्कम पाया आम्हाला लाभला 'आम्ही युद्ध हरलोच नाही तर आम्ही जिंकणारच' हा सुनंदा बोदिले यांचा आशावाद महत्वाचा आहे.
ढगाळलेल्या आभाळाने सुंदर मानवतेचे रोपटे जन्मास घालण्यासाठी बोधीवृक्षाची छाया सर्वावर धरण्यासाठी बरसावे. जगात मैत्रिभाव व शांतता नांदावी अशी याचना कवयित्रीचे संवदेनक्षम मन आभाळाला करते. कविता वाचकांच्या मनात रुजावी कवितेच्या आशयाला कवितेतील जीवनस्त्याला आकार शब्दामुळे लाभते. शब्दात उत्कटता प्रत्ययकारकता भावगर्भता आशयघनता येण्यासाठी उचित शब्दयोजना असावी म्हणून शब्दाचे महत्व सांगताना शब्द कवितेत त्या म्हणतात-
"शब्दच घेऊन जातात
उंच क्षितिजा पलीकडे
अवकाशातील ग्रहतारे शोधण्यासाठी
शब्दच होतात लाव्हारस"
शब्द जीवनाचे सार सांगतात. जिंदगीचा जमाखर्च मांडतात मन, मेंदू, शरीराचे विच्छेदन करतात शब्दांनीच जीवाभावाची नाती जपली जातात. शब्दाची निर्मिती कवीच्या रक्तामधून होत असते. 'माणूस बनविणे' माणसाला केंद्रस्थानी मानणे, धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. विषमतेच्या जखमा रक्तात भळभळत असतांना मनातील आकांत- वेदना माणुसकी तारण्यासाठी शब्दाद्वारे जन्मतात. कविता शरत्राचे रूप धारण करते.
"आता लेखणीला हत्यार केलेले बरे
बुध्दाच्या मध्यम मार्गातून
कबिराच्या दोहयातून
फुल्यांच्या निर्भिड साहित्यातून
तर घटनाकाराच्या संविधानातून
हे माझ्या कल्याणकारी देशा!'
मानवी स्वातंत्र्याचा गाभा हा विज्ञाननिष्ठ विचारात असतो. तेथे एका मनुष्य समूहाचे अधिकार जास्त व दुसऱ्या 'समूहाचे अधिकार कमी हा विषय निराधार ठरतो.तेथे चातुर्वर्ण्य समाज व्यवस्थेचे तत्वज्ञान कोलमडून पडते.. हया विश्वात कोणी कोणाचा मालक नाही. सर्व स्वतंत्र आहेत. हाच दुःखनाशाचा उपाय होय. 'मैत्रीची धम्म पहाट होण्यासाठी, मानव्याचा शोध घेण्यासाठी मोक्षदाता नव्हे तर मार्गदाता हवा असतो.
"बुद्धं सरणं गच्छामीचा
मंद मंद स्वर सुरू असतो
शांतचित्त कायेने व्याप्त
बुद्ध हसत असतो".
देव, धर्म, मंदिरे, चमत्कार हे सर्व मानवमुक्तीच्या. मार्गातील अडथळे आहेत. या विषमतावादी अडथळ्यामुळे निरपराधी लोक अन्याय-अत्याचाराच्या वणव्यात पेटत आहेत. अशावेळी बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञान रक्तहीन परिवर्तनाच्या मार्गाने मानवतेचा दीपस्तंभ तेजोमय करण्यासाठी सज्ज झाले आहे.
स्त्री जीवन विषयक कवितेत थेरीनी आपल्या जीवनजाणिवा मधून मानवमुक्तीचे तत्वज्ञान मांडले, भद्रा कात्यायना हया कवितेत त्या म्हणतात की,
"धम्माच्या मार्गात चिंब भिजतांना पाहून
माझेही पाय वळतात त्या दिशेन
बुध्दा!
तू जगाला बहाल केलेले औदार्य आठवते
आणि मी, यशोधरेची भद्राकात्यायना होते"
स्त्री नवनिर्मिती निर्मिती तत्व, पुष्पवती फलवंती वेल भविष्यात अनंत काळपर्यंत वंश विस्तारित करण्यासाठी तिला कितीतरी स्थित्यंतरातून जावे लागते. प्रकृती हे अर्थातच स्त्रीत्व असतं. निर्मिती क्षमतेशी समानता असल्यामुळेच स्त्रीची पृथ्वीशी तुलना केली जाते. पृथ्वीच्या उदरातून उगवणाऱ्या झाडांमध्ये स्त्री शक्ती दिसते. पण ह्या स्त्री कडे एक मादी, उपभोग्य वस्तू म्हणून पाहणारे समाजकंटकही आहेत.
"वासनांध नजरेचे बळी
देहाचे लचके तोडणाऱ्या
या अमानवी वस्तीत
अजून माणूस जन्मलाच नाही".
'ती एक स्रीच असते' आणि 'ती' या दोन्ही कवितेत स्त्रीचे जीवघेणे कष्ट, संघर्ष, वादळे पेलत पोटाची आग शमविण्यासाठी सज्ज असलेल्या स्त्रीचे चित्रण, तिची दयनीय अवस्था चित्रित केली आहे. बालिकेपासून म्हातारीपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्यावर बलात्कार होतात. अशावेवी 'गुलामीचा धिक्कार कर, स्वतःचा सन्मान कर' असा आत्मसन्मानी सल्ला कवयित्री देते. 'तिला माणूस शोधायचा आहे' ह्या कवितेतही पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये स्त्रीचा श्वास गुदमररून गेला आहे. तिची अस्मिता दावणीला बांधली आहे.
"आता ती इथल्या
रानटी हिंस्र पशूमध्ये
माणूस शोधत आहे"
परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या स्वतंत्र अस्मिता जोपासणाऱ्या, सत्यान्वेषी स्त्रीचा निर्घृणपणे खून होतो. अशा समाजातील षंढाना गर्भातच पुरले पाहिजे.
'गौरी लंकेश' अशाच विषमतावादी पुरुषसंस्कृतीचा बळी झाली. गौरी लंकेशचा विचार रुजण्यासाठी बुद्ध भूमीच हवी. ' 'माय' या कवितेत स्त्रीच्या वाट्याला आलेले भोग, बंधने, मर्यादा, निकृष्ट दर्जा वर्णिले आहे. पण त्यावरही तिने विजय मिळवून संविधानाला प्रमाण मानून धैयाने, निर्भिडपणे संकटावर विजय मिळवावा.
"अशोक चक्र असेल माते
तुझ्या बलिदानाची शान
तुझीच यशोगाथा गाईल
युगानुयुगे संविधान"
आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासातूनच संघर्षशक्ती सर्जनशक्ती निर्माण होते. शोषिताविषयी संवेदना करुणा निर्माण होते. मानसिक गुलामगिरी झुगारण्याचे बळही मिळते. आंबेडकरवादी कवयित्रीनी मानवी जीवनाच्या उच्च नैतिक प्रेरणा प्रदीप्त केल्या आहेत. तसेच शोषकाविरुद्ध चीड व निषेध व्यक्त करण्यासाठी जळजळीत भाषेचाही वापर केला.
माणूस ,झाड आणि माती या कविता संग्रहात सुनंदा बोदिले यांच्या कवितेला बुद्ध-फुले-आंबेडकरांचे तत्वज्ञान, ध्येयवादाचा आधार आहे.म्हणून कवितांना लोकशाही संविधानाची बैठक लाभली आहे. त्यातून मानवतेचे सौंदर्य प्रतित होते. कवयित्रीची काव्याभिव्यक्ती मुक्तछंदात्मक असून स्वतःच्या उत्कट जीवनानुभवाला श्रद्धामूल्यांना सखोल चिंतनाला न्याय देणारी आहे. कवितेमधून बुद्धाची करूणाधिष्ठीत समता जशी बरसते, तसेच प्रतिक्रांतीच्या विरोधात लोकमानस तयार करण्याची प्रेरणाही जागृत होते.
सिद्धार्थ गौतमाला जसे मृत्यूतून जीवनाचे कोडे उलगडले. म्हणजे जन्म-जरा-मृत्यू या मानवी जीवनाच्या अटळ घटनामधून नवनिर्मिती होत असते. हे माणूस - झाड आणि माती या प्रतीकामधून कवयित्री स्पष्ट करते. संपूर्ण कवितासंग्रहात तथागत बुद्ध; महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विज्ञाननिष्ठ धम्म याचा प्रतिध्वनी उजागर होताना जाणवतो. मानवी मूल्यांच्या पडझडीमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या. त्या समस्याचे कारण शोधून मानवतावादी विचाराचे सुंदर विश्व निर्माण व्हावे अशी अपेक्षा मनी बाळगून कवयित्रीच्या माणूस, झाड, माणूस या काव्यसंग्रहाची निर्मित झाली. असेच साहित्य त्यांच्याकडून निर्माण व्हावे ही सहिच्छा.
- डॉ. आशा थोरात
अमरावती