कवी, माजी सैनिक निवृत्त सुभेदार दीपक ढोले यांनी संपादित केलेला सैनिकी कविता' हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. दीपक ढोले हे स्वतः सैनिक आहेत, सैनिक पुत्र आहेत. त्यांची स्वतःचीही कविता या संग्रहात आहे. सैनिकी जीवन जगलेल्या एका सैनिकांनेच हा संग्रह प्रकाशित केलेला असल्यामुळे या संग्रहाचे महत्त्व आणखीच वाढले आहे. सैनिक हा केवळ व्यवसाय म्हणून सैन्यात जात नाही, तर त्याच्या मनात देशभक्ती ओतप्रोत भरलेली असते म्हणून तो सैन्यात असतो. आपल्या मनोगतात दीपक ढोले म्हणतात, 'सैनिक तिरंग्याच्या सन्मानासाठी आन, बाण, शान आणि प्रसंगी प्राणही पणास लावतो. 'सैनिक सीमेवर जातो तेव्हा त्याच्यासाठी मातृभूमी हीच कुटुंब बनत असते. दुसरा विचार त्याच्यासाठी दुय्यम ठरत असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी सैनिक बनणे हे शक्य नसते. दीपक ढोले म्हणतात त्याप्रमाणे सैनिक ही वृत्ती आहे. ही वृत्ती अंगी बिनवलेली असल्यानेच सैनिक सैन्यात असतो. त्याच्याकडे अपूर्व धैर्य असते. जीवनात सर्वगोष्टींची समाप्ती करणारा मृत्यू ही एक अशी बाब आहे, ज्याला जगातला प्रत्येक मानव प्राणी भीत असतो. पण सैनिकाच्या बाबतीत मृत्यूला अलिंगन देण्यास तो सदैव तयार असतो.
दीपक ढोले मनोगतात म्हणतात, 'मृत्यू पुढे दिसत असतांनाही पुढे पाऊल टाकण यासारख धैर्य नाही.' दीपक ढोले यांनी या संग्रहाचे संपादन करतांना त्यात एकसूरीपणा येणार नाही याची पुरेशी काळजी घेतलेली आहे.
पुनरावृत्ती टाळून विविधांगी कवितांची त्यांनी निवड केलेली आहे. या संग्रहात सैनिकाविषयी सामान्य जनतेतील कवींनी व्यक्त केलेले भाव आहेत, तसेच सैनिकी जीवन जगलेल्या सैनिकांच्याही कविता आहेत. सैनिक सीमेवर असतो; पण त्यांच्या संसाराचा गाडा एकहाती चालविणाऱ्या त्यांच्या अर्धागिनींच्याही कविता या संग्रहात आहेत. या संग्रहातून भारतीय फौजेत जाण्याचा संकल्प तरुण करू शकतील, त्यांना हा संग्रह प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा दीपक ढोलेंनी व्यक्त केली आहे.
या संग्रहाला प्रसिद्ध कवी यशवंत मनोहर यांची दीर्घ प्रस्तावना आहे. सैनिकांच्या बाबतीत ते म्हणतात, 'युद्ध ही त्याची गरज नसते, पण युद्धाला मात्र त्याची गरज असते.' युद्ध ही अपरिहार्यता असते. त्याला युद्ध नको असले तरी त्याला जीव धोक्यात घालून ते लढावे लागते. प्रस्तावनेचा अधिकांश भाग हा युद्ध या संकल्पनेवर भाष्य करणारा आहे. युद्ध ही अप्रिय गोष्ट आहे हे सर्वमान्यच आहे. शेवटी मनोहरांनी युद्ध व पर्यायाने सैनिकविहिन असलेली विश्वव्यवस्था असलेल्या जगावर कविता लिहिण्याचा अवसर प्राप्त होवो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
संग्रहातील पहिलीच कविता कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची आहे. स्वातंत्र्यलढा असो किंवा त्याआधी देशरक्षणार्थ झालेली हजारो युद्धे असो, त्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची आठवण कोण ठेवतो. काही मोजक्या सैनिकांचा इतिहास नावानिशी लिहिला जातो. इतर सैनिकांची दखल इतिहास केवळ संख्येच्या रूपात घेतो. जसे, पानीपतात एक लाख सैनिक कामास आले. यामुळेच कुसुमाग्रज लिहून जातात-
'अनामवीरा, जिये जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात!'
एक गाणे पूर्वी रेडीओच्या जगात खूपदा ऐकायला मिळायच.
'भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी'
गदिमांची ही कविताही या संग्रहात आहे. परंतु मित्रहो मला नेहमी प्रश्न पडतो युद्धकाळात उफाळून येणारी आपली देशभक्ती सदैव तशीच टिकून राहते ? सैनिकाला पुढे जाण्यास प्रोत्साहन देणारी वसंत बापटांची कविता या संग्रहात आहे.
कवितांची निवड करतांना संपादकाने नव्या-जुन्या, प्रस्थापित-नवोदित, दिवंगत-हयात, स्त्री-पुरुष अशा सर्वच कवी-कवयित्रींच्या कवितांचा समावेश या संग्रहात केला असल्याने हा संग्रह सर्वसमावेशी असा झाला आहे. संपादकाच्या स्वतःच्या दोन पिढ्यांनी देशाच्या सीमांचे रक्षण केलेले आहे. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबियांची व्यथा व परवड त्यांना चांगलीच परिचीत आहे. सैनिक हा देशासाठी घरदार सोडून सीमेवर जाता. त्याचा त्याग हा सगळे जग पाहते, पण त्याच्यासोबतच त्याच्या परिवारालाही मोठा त्याग करावा लागतो, त्यांचा त्याग मात्र दुर्लक्षित राहतो. खरे तर सैनिकाच्या त्यागापेक्षाही त्याच्या परिवाराचा त्याग मोठा मानला पाहिजे. वर सांगीतल्याप्रमाणे सैनिकी वृत्ती असते म्हणून सैनिक सैन्यात जातो, परंतु त्याच्या परिवारातील स्त्री, लहान मुले, वृद्ध माणसे यांच्याकडे सैनिकाचे धैर्य असेलच असे नाही, परंतु त्यांना ते जाणीवपूर्वक बाणवावे लागते. ते धैर्य अंगी बाणवण्याचे त्यांचे वय असो वा नसो म्हणून त्यांचा त्याग मोठा असतो. संपादकाने या संग्रहात सैनिकांच्या पत्नीच्याही कवितांचा समावेश केला आहे. हा समावेश या संग्रहाचे महत्त्व अधिकच वाढवून जातो.
या संग्रहाचा अभ्यास केला तर दिसते की संग्रहात सैनिकाला प्रोत्साहन देणाऱ्या कविता आहेत, त्यात सैनिकाला त्याच्या घरातून धैर्याचा बाणा शिकवणार्या कविता आहेत, सैनिकाच्या त्यागाचे, देशभक्तीचे वर्णन करणाऱ्या कविता आहेत, युद्धाची अपरिहार्यता सांगणाऱ्या कविता आहेत. सैनिकांप्रति देशवासीयाचे कर्तव्य सांगणाऱ्या कविता आहेत, सैनिकांची स्वतःची मानसिकता वर्णन करणाऱ्या कविता आहेत, त्याचप्रमाणे अकारण युद्ध लादणाऱ्या व्यवस्थेवर रोष व्यक्त करणाऱ्या कविता आहेत आणि युद्धाचा तिरस्कार करणाऱ्याही कविता या संग्रहात आहेत.
सैनिकाची पत्नी, आई यांनी सैनिकांना प्रोत्साहित करणाऱ्या कविता :
सैनिक आपल्या परिवारापासून दूर राहतो. देश हाच आपला परिवार मानतो. मात्र परिवाराचे सारे लक्ष देशाच्या सीमेवर लागलेले असतो. युद्धाच्या वार्ता यायल्या लागल्या की, सैनिकाचा परिवार हा गांगरून जातो. मात्र आपल्या देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकाचे धैर्य वाढवण्याचे काम कुटुंबीय करत असतात. मुलाशिवाय आईवडील, बापाशिवाय मुले, पतीशिवाय पत्नी दिवाळी, दसरा कसा साजरा करीत असतील? सैनिकाच्या परिवाराच्या भावना व्यक्त करणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. पदमा गोळे यांची 'निरोप' या कवितेतील आई रणात जाणाऱ्या आपल्या मुलास धिरोदात्तपणे निरोप देते.
'लढ पोरा' या कवितेतील आई आपल्या सैनिक पुत्रास म्हणते-
'भारतमातासाठी लढ पोरा
पर, आपल्या मायसाठी
काळजी घे सोताची.'
'परमवीरचक्र' ही कविता वीरपत्नीला सैनिकाच्या जाण्यानंतर समाजात रोज जगतांना करावा लागणारा संघर्ष सांगते. 'कुंकूच बलीदानाच' ही आणखी एक वीरपत्नीची कविता. 'लढा' या कवितेत वीरपत्नी म्हणते,
'न डगमगता यशाचं शिखर चढायचं
तुम्ही सीमेवर, मी सीमेआतील शत्रूसोबत लढायच'
'भारत मातेच्या वटीत' हे कवितेचं शिर्षक सगळा आशय सांगून जाते. 'प्रिय बाबा' ही सैनिकाच्या चिमुकल्याने सैनिकास लिहिलेली कविता 'बाबा तुमच्या हातून मला खायचाय रोज भाता सुट्टीवर कधी येता' हा भावनिक करणारा प्रश्न उपस्थित करते. 'बाबांची परी' ही कविताही डोळयात पाणी आणते.
'आई तूच म्हणतेस ना
मी बाबांची लाडकी परी
मग सांग ना गं आई
बाबा कधी येतील घरी'
'देशाला प्रथम प्राधान्य' या कवितेत सैनिक पत्नी सैनिकाला देशप्रथम ही उभारी देत आहे. 'शहीद जवानाच्या मायची व्यथा!' ही सैनिकाच्या आईचे कथन आहे. या प्रकारच्या बहुतेक कविता सैनिक परिवारातील व्यक्तींनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे या कवितांना वेदनेची अस्सल झालर आहे.
सैनिकांप्रति देशवासीयांना कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या कविता:
वामनदादा कर्डक आपल्या कवितेतून देशवासीयांना 'चिंता तूला आहे का?' असा सवाल करतात. आपण घरी सुखी असतो केवळ सैनिकामुळे ते म्हणतात,
'ओवाळीते इथे तुला भगिनी तुझी परी आपुली दिवाळी साजरी समरात तो करी'
सैनिकांना उद्देशून लिहिलेल्या कविता :
यशवंत मनोहर आपल्या 'शूर सैनिकांनो' या कवितेत सैनिकांना उद्देशून म्हणतात,
'तुटून पड़ता तुम्ही
सभ्यता विद्रूप करणाऱ्या
असभ्यतेवर.
उजेडाची हत्या होऊ नये म्हणून.'
सैनिक कोणाला मारण्यासाठी युद्ध लढतो आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात तो ते युद्ध मानवाच्या हितासाठीच लढत असतो. हिटलर सारख्या प्रवृत्तींना संपवले नसते तर जगात किती मानवांचा अकारण संहार झाला असता. सारांश युद्ध हेही अंतिम शांततेसाठीच लढले जातात असे विरोधाभासी तत्व आहे. 'युद्धाई' ही कविता याच प्रकारातील. 'एक गुलाबपुष्प' ही कवि देशवासियांना सैनिकांप्रति असलेल्या आपल्या उदासिनतेची जाणीव करून देते. 'लढवय्ये' ही सुद्धा याच प्रकारातील एक कविता सैनिकांच्या देशभक्तीचे, त्यागाचे वर्णन, शौर्याचे वर्णन करणाऱ्या करते. या संग्रहात सैनिकांच्या देशभक्तीचे गोडवे गाणाऱ्या, त्यांच्या त्यागाला नमन करणाऱ्या, त्यांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या कवितांचा समावेश आहे ज्यामध्ये 'नरसिंह' ही कवी श्रेष्ठ विठ्ठल वाघांची कविता सैनिकांच्या कुटुंबीयांना काय त्याग करावा लागतो हे सांगून जाते. 'युद्धभूमीच्या कविता', 'युद्धपोत', 'वीर जवाना सैनिक हो..', वंदे मातरम् 'तूच पहारा देऊन आहे', 'देशभक्त', 'सैनिका तुझ्याचसाठी', 'सैनिक' 'सैनिका', 'सीमेवरती देत पहारा', 'प्रणाम', 'सैनिकांनो', 'जय जवान,' 'निशान सैनिका तुला..', 'सैनिका', 'तू सैनिक', 'एक पणती सैनिकांसाठी', 'फौजी', 'सुपूत्र शिर्ल्याचा', 'जय जवान, जय किसान', 'रक्तातली ताकद', 'वीरमातेस' 'सैनिकांच्या संसारास', 'सैनिकी जीवन', 'पोशिंद्याच्या नाही पापणीला झोप', 'येत्या पावसात', 'सुजलाम सुफलाम भारत आपला', 'जवान', 'देशासाठी' 'देशसेवक', 'अभिनंदन फौजी', 'सैनिकाच जीण कसं असतं?, स्वातंत्र्याचा योद्धा, 'जळू दे कर्तव्याच्या वाती, आम्ही शिकवितो फक्त कविता', 'वीर वृत्तीला -अभिवादन' 'भारतीय सेना' 'तुम्हा वंदितो सैनिका', वीरमरण', 'विरांना त्या सलाम क्रांती कोटी', 'सैनिकांस पत्र !' या कविता या प्रकारच्या आहेत. एकीकडे सीमेवर अहोरात्र डोळयात तेल घालून पहारा देणारा सैनिक दुसरीकडे देशातील बोकाळलेला भ्रष्टाचार यावर ताशेरे ओढत डोळयात अंजन घालणारी कविता डॉ. मनोहर नाईक लिहीतात. ते सैनिकास पत्र या कवितेत म्हणतात,
'तुझ्या तीक्ष्ण पहाऱ्याने
बाह्य शत्रू जेरबंद झाले
पंरतु देशात हल्ली
कुंपणच शेत खाऊ लागले....'
सैनिकालाही या परिस्थितीची माहिती असावी म्हणून ते त्याला उद्देशून म्हणतात-
'देशाच्या सीमेवर
तुझा कडक पहारा असू दे
सोबतच तुझी करडी नजर
आतील निवडुंगावरही
राहू दे!'
शहीद सैनिकाला उद्देशून महेद्र ताजणे म्हणतात,
'कॅप्टन !
तुमचा कधीच होऊ शकत नाही क्षय
आहात तुम्ही अक्षर नि
राहाल अक्षय!
आमची सलामी स्वीकारा कॅप्टन !!!!
मोहन शिरसाट यांच्या कवितेतून आपल्या गावातील सैनिकांप्रती गावकऱ्यांना वाटणारा अभिमान प्रगट होतो. 'याच आशयाची 'शूर सैनिकहो.... सॅल्यूट!' ही कविता. संग्रहात याच प्रकारातील सर्वाधिक कविता आहेत.
सैनिकांचे स्वगत असलेल्या कविताः
नारायण सुर्वे यांची 'भारतीय जवानाचे पत्र' ही कविता युद्धदरम्यान सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी कविता आहे. ते म्हणतात,
'अशा थोर भूमीत जन्मलो आपण इथेच जन्मला बुद्ध सांडले अकारण रक्त चिन्यांनी लावले अकारण युद्ध'
पात बुद्धाची भूमी असली तरी युद्धांची अगतिक अपरिहार्यत कविने व्यक्त केली आहे. यातला सैनिक प्रथमदेशकर्तव्य व मग घरसंसार या भावनेतून म्हणतो,
'थांब, हुकुम झाला आहे, अग्नीवर्षाव करतो मग लिहितो.'
'युद्धाई', सैनिकात भरती होणारा सिपाही हा सैनिकी बाणा अंगी बाणवलेला असतो. मातृभूमीच्या रक्षणासाठी तो सैन्यात भरती होतो. जाज्वल्य राष्ट्राभिमान त्याला राष्ट्रासाठी प्राणार्पणास सिद्ध करत असतो पण सैन्यातही त्याला वर्णद्वेष पाहायला मिळाल्यावर तो सैनिक उद्विग्न होतो पण अंगी त्याच्यात असलेल्या सैनिकी बाण्याने तो हा अपमान गिळतो आणि म्हणतो,
मी सावधान होऊन,
दात-ओठ खात
मारून कडक सॅल्युट
दाबतो त्याच्या सातपिढ्या
किलबुटाच्या टाचेखाली
अन्
मापतो हरॅशमेंट ची खोली !'
'सज्ज' नावाची कविताही याच आशयाची आहे.
'डौलानं लहरणारा तिरंगा', 'सैनिक एक वेदना' सैनिकांना व्यवस्थेचा राग येतोच येत नाही असे नाही. या कवितेत कवी म्हणतो,
'तुम्ही म्हणताय आईप्रमाणे निस्सीम प्रेम आहे माझं या धरतीवर...
मला तर पोकळ देशभक्तीचं अवडंबर वाटतंय,
कारण कुणी ही पहा, कामं कमी पण श्रेयच
जास्त लाटतंय'
देविदास जाधव हा सैनिक कवी म्हणतो,
मी एक सैनिक जीवन जगत आहे,
मनुष्य हा माझा धर्म आहे.'
'वीरमाता' या कवितेत सैनिक आपल्या आईकडे बळ मागत आहे. 'परमवीर' या कवितेतही सैनिक आपल्या सखीकडे हसतमुखाने निरोप मागत आहे. 'निडर देशभक्त' या कवितेत सैनिक कवी म्हणतो,'निघालो गोळा बारूद बांधून छातीला.'
'लढता, लढता' या कवितेत सैनिक म्हणतो-
'शेवटची गे राखी बहिणी
बांध झाली मजला घाई
येईन देण्या ओवळणी तुजला
तु रडू नको ताई...'
या व अशाच अनेक भावनिक ओळी यात आहेत. 'बांध शेताचा आणि देशाचा' शेतकरी आणि जवान यांच्यातील साम्य दाखवणारी सैनिकी कविता आहे.
'धरणी माते', 'शूरा मी वंदिले',' या आणखी काही स्वगत व्यक्त करणाऱ्या कविता संग्रहात या प्रकारातील बहुतेक कविता सैनिकांच्या आहेत.
युद्धांबाबत रोष, तिरस्कार व्यक्त करणाऱ्या कविता :
खरे तर युद्धात सैनिक सैनिकांना मारत अगतो. दोन देशातील सैनिक नात असतात. निसर्गाचा युद्ध हा कधीच उद्देश नसावा. याचप्रकारची जाणीव 'दुःख' या कवितेतून लोकनाथ यशवंत देतात. 'युद्धविरोध’ ही अशोक नामदेव पळवेकरांची कविताही हेच सांगते. 'युद्ध आणि बुद्ध' ही सुद्धा एक अशीच युद्धाबावत कृतक कोप व्यक्त करणारी कविता आहे. देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकाला आपण मानवंदना देतो, मान देतो मात्र त्यामुळे त्याच्या कुटुंबियावर आलेले दुख नाहिसे होत नाही. युद्धे थांबली पाहिजेत हाच यावरचा उपाय आहे. म्हणून 'सैनिकाची गोष्ट' या कवितेत डॉ. अशोक इंगळे म्हणतात,
'हे माझ्या देशा !
डोळयात तेल घालून पहारा देणाऱ्या
किती सैनिकांचे बलिदान हवे तुला'
'हतबल' ही कविताही युद्धाची निरर्थकता सांगणारी कविता आहे. सारे त्याग सैनिकांनीच करावेत का? काही झळा सामान्य देशवासीयानी सोयायला नकोत?म्हणून प्रशांत ढोले म्हणतात,
'सर्व मिळूनी चला एकसाथ लढा देऊ,
सैनिकांनीच इथे मरावे कितीवेळा !'
'इकडेही तिकडेही', 'सैनिकच' 'नं संपणारं युद्ध', 'सैनिक हो.. "युद्धानंतर', युद्धाबाबत राग, तिरस्कार व्यक्त करणाऱ्या हया आणखी काही कविता. युद्ध कोणालाचा नको असले तरी युद्ध संपवण्याचा अपरिहार्य मार्गही युद्धच असतो.
या कविता संग्रहाचे शिर्षकच सैनिकी कविता हे असल्याने या संग्रहात अनेक कवितांचे शिर्षक सारखेच आले आहे. जसे, 'सैनिक', 'जय जवान' इत्यादी. बऱ्याचदा आशयाचीही पुनरावृत्ती झाल्याचे जाणवेल. संपादकाने पुनरावृत्तीचा दोष टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचे आपल्या मनोगतात म्हटलेच आहे. तथापि या प्रकारचा हा पहिलाच संग्रह असल्याने तो निश्चितच वैशिष्टयपूर्ण असा संग्रह आहे आणि संग्रही ठेवण्याइतपत मुल्य त्याला नक्कीच आहे. 'सैनिकी कविता' या कविता संग्रहाचे माझ्याकडून स्वागत व संपादकाचे आणि यात कविता समाविष्ट असलेल्या हयात कविंचे अभिनंदन!
-डॉ. प्रा. भाऊराव रामेश्वर तनपुरे,
वाशिम