१) रंग
'मजा आली, आकाश हिंदू झालं'
शेजारी मोठ्याने ओरडून म्हणाला
'आता तर आणखी मजा येईल' मी म्हणालो
'पाऊस येऊ देत
सगळी धरती मुसलमान होईल !'
२) एक झाडंही शिल्लक उरावं
शेवटच्या वेळी जेव्हा कुणी सोबत येत नाही
एक झाड येईल
आपल्या चिऊताई आणि खारुताईपासून दूर होत
एक झाड सोबत येईल
सरणावर चढेल तेच झाड माझ्याही आधी...
'किती लाकडं लागतील'
विचारेल मसनजोगी
अगदी गरीबातल्या गरीबाला देखील सात मन लाकडं लागतात
मी लिहितो इच्छा पत्रात-
'मला विद्युतदाहिनीत केले जावेत अंत्यसंस्कार'
जेणेकरून माझ्या नंतर
एका मुला आणि मुलीसोबत
एक झाडही शिल्लक उरेल या जगात !
३) जमीन आणि आकाश
ज्याच्याकडं गेली माझी जमीन
त्याच्याकडेच निघून गेला आता पाऊसही माझा
आता जे दाटून येतात काळे ढग
त्याच्यासाठी येतात.
कोकिळा कुहू कुहू त्यांच्यासाठीच करतात
त्याच्यासाठीच येतो
मातीचा मस्त धुंद सुगंध !
आता नाही माझ्यासाठी
नांगर नाही, बैल नाही
शेताची वाट नाही
एक हिरवा थेंब नाही
पोपट नाही, तळे नाही, नदी नाही
आर्द्रा नक्षत्र नाही
मेघमल्हार नाही माझ्यासाठी
ज्याला नाही कोणतीच जमीन
त्याला नाही कोणतंच आकाश !
४) चांगली मुलं
काही मुलं खूपच चांगली असतात
ते मागत नाहीत चेंडू, फुगा मागत नाहीत
मिठाई नाहीत मागत ते मुलं, धरत नाहीत हट्ट
आणि वेडेपणा तर अजिबातच करत नाहीत
ते ऐकतात मोठ्यांचं सांगणं
लहान्याचंही ऐकतात
इतके ते असतात-
चांगले आणि समजूतदार !
अशा चांगल्या मुलांच्याच तर शोधात असतो आम्ही
आणि ते भेटताच,
घेऊन येतो त्यांना घरी
तीन रुपये महिना आणि दोन वेळच्या जेवणाच्या बोलीवर फक्त !
५) बासरी
बासरीच्या इतिहासात
त्या किड्यांचा उल्लेख नाहीये कुठंचं
ज्यांनी भूक भागवण्यासाठी
पाडली होती वेळूला छिद्र
आणि जेव्हा केव्हा हवा वाहायची त्या छिद्रातून
तेव्हा ऐकायला यायचं वेळूचं रडणं
किड्यांना काय ठाऊक
की ते कताहेत हस्तक्षेप संगीताच्या इतिहासात
आणि करताहेत अशा वाद्यांची निर्मिती
ज्यात वाजवणाऱ्याचा श्वास वाजत असतो
मी कधीतरी लिहिलं होतं
की बासरीत वाजत नाही श्वास
वेळूही नाही वाजत
वाजवणारा वाजत असतो बासरीत !
आता
जेव्हा जेव्हा वाजवत असतो बासरी
मग भले राग कोणताही का असेना
त्यातून काहींची भूक
आणि वेळूचं रडणं ऐकायला येतं !
६) काही लोक
काही लोक पायांनी नाही
डोक्याने चालतात
हे लोक
जोडे चपला शोधतात
आपल्या मेंदूच्या मापाचे.
७) सिढी
मला एक सिढी हवी आहे
सिढी भिंतीवर
चढण्यासाठी नाही
उतरण्यासाठी हवीय...
गड नाही जिंकायचा मला
मला... सुरुंग लावायचा त्याला !
८) पायऱ्या
पायऱ्या
चढतांना
जे उतरायला
विसरतात
ते घरी नाहीत
परतत
कारण पायऱ्या
कधीच संपत नाहीत !
९) बाळ
संगीत समजतं
आता तो अर्थ समजून घेतोय
फुसरतीत शिकेल भाषा !
१०) मुडदे
मेल्यानंतर सुरू होतं
मुडद्याचं अमर जीवन
तर मग,
अकडण्यापासून कुणी रोखू शकत नाही त्यांना
मजाच मजा असते मुडद्यांची
फक्त यांच्यासाठी एकदा
मरावं लागतं !
११) वाळवी
वाळवीला
वाचता येत नाही
अख्खंच्या अख्खं
पुस्तक !
१२) पाणी
दगडांवर खुणा सोडल्यात
अजबच बात आहे,
दगडांनी पाण्यावर
कुठलीच खूण नाही सोडली !
१३) मढी शाळेची मुलं
त्यांच्यात माणसांचं नाही
एका जंगलाचं बालपण आहे
जंगलं जी हरळीनं कापली गेली
आणि आता फक्त-
आगच होऊ शकतात
नाही,
मुलं फूल असत नाहीत
फुलं शाळेत जात नाही
शाळा जळणारं जंगल नाहीये काही !
१४) भूक
नंतर खाते डोळे
मग देहाचे उरलेले बाकी अवयव खाते
काहीही खायचं सोडत नाही भूक
भूक नात्यालाही खाऊन टाकते
नातं मायचं असो, नाहीतर बहिणीचं वा मुलाचं
मुलं तर खूपच पसंत आहेत तिला
ज्यांना ती सगळ्यात आधी
आणि मोठ्या तावात खाऊन टाकते
मुला नंतर मग उरतंच काय !
१५) कविता
जशी चिमणीच्या उडण्यात
सहभागी असतात झाडं
तशा कविता असतील का आमच्या सोबत संकट काळात?
जशी युद्धात धारातीर्थी
पडलेल्या सैनिकाच्या वर्दीसोबत- शस्त्रांसोबत
रक्तात माखलेलं सापडतं त्याच्या मुलाचं चित्र
एखादी कवितेची ओळ रक्तात बुडून माखेल ?
जशी चिमण्यांच्या उडण्यात सहभागी असतात झाडं
संकटात कोणत्या कविता असतील आमच्या सोबतीला
भांडणासाठी उगारलेल्या हातात
कोणते शब्द असतील?
१७) हसू
भयानक असते रात्र
जेव्हा कुत्रे रडत असतात
पण त्याहीपेक्षा भयानक असते ती रात्र
जेव्हा कुत्रे हसत असतात
ऐका, तुम्हाला ऐकायला येतोय का
कुणाच्या हसण्याचा आवाज ?
१८) भीती
दगडांच्या आजूबाजूला
फुलं त्यांना शिकवत राहिले-
उमलून येणं
दगड भीत राहिले
त्यांना दिसत राहायचं
फुलांचं कोमेजणं !
१९) जोडे
ज्यांनी स्वतः केली नाही आपला प्रवास यात्रा
दुसऱ्यांच्या यात्रेचं साधनचं बनून राहिली
एका जोड्याचं जीवन जगलं त्यांनी..
यात्रा संपल्यानंतर;
त्यांना घराबाहेरच ठेवण्यात आलं !
२०) साम्य
समुद्राचा निर्जन पाहिल्यावर
अगदी तशीच, भीती वाटते
जशी, वाळवंट पाहतांना वाटत असते...
अजबच साम्य आहे समुद्र आणि वाळवंटामध्ये
दोघेही असतात विशाल
लाटांनी भरलेले
आणि दोघेही
भटकलेल्या माणसाला तहानलेलं मारतात !
इतिहासातल्या अनेक भ्रमांपैकी
महमूद गजनी परत गेला होता
एक भ्रम हा देखील आहे-
परतला नव्हता तो
इथंच होता
शेकडो वर्षांनंतर अचानक
तो प्रकटला अयोध्येत
-------------------------------------------------
मुळ कवी- नरेश सक्सेना
अनुवाद - कबीर