१) पिवळी पानं
तोडू नका
पिवळ्याधम्म पडलेल्या पानांना,
जोपर्यंत;
ते स्वतःहून गळत नाहीत आपल्या फांदीपासून
हा
कोण्या बुजूर्गाच्या हत्येचा
मामला होऊ शकतो !
२) दुःख १
त्यांच्याजवळ दुःख होतं
त्याला व्यक्त करण्यासाठी
त्यांच्याजवळ शब्द नव्हते
आमच्याजवळ दुःख नव्हतं
शब्दच शब्द होते
आम्ही त्यांच्या दुःखाला
आपले शब्द दिले
या शब्दांच्या बदल्यात
त्यांनी कधी
आम्हाला दिलं नाही आपलं दुःख !
३) दुःख २
मोह वेचणार्या
बाईचं दुःख
मोहफुलासारखं टपकत जातं
निःशब्द
कुणी त्याला पाहू नाही शकत
ती
त्यालाही गुपचूप गोळा करून
ठेऊन देते
मोहफुलांच्या टोपलीत!
४) तपास
ज्याचे हात मोकळे होते
तो खूनी होता
ज्याच्या हातात बंदूक होती
तो निवांतपणे
तिची नळी साफ करत होता
गोळी बंदूकीतून सुटली होती
जे मारल्या गेलं ते लोकतंत्र होतं
लोकतंत्रचा मारेकरी तो होता;
ज्याचे हात मोकळे होते !
५) राजा शालीन आहे
तुम्ही राजाचा निंदा केली
राजा तरी काही नाही बोलला
तो फक्त हसत राहिला
राजा सहिष्णु आणि शालीन आहे
तुम्ही राजाच्या विरोधात नारे दिले
राजा तरिही हसत राहिला
राजा सहिष्णु आणि शालीन आहे
राजाचे शिपाई आले
त्यांनी तुम्हांला उचलून
महालाच्याबाहेर फेकुन दिलं
राजा त्यांनाही काही नाही बोलला
फक्त हसत राहिला
राजा कमालीचा शालीन जो आहे!
६) तुटणं
तुटा
हरलेल्या योध्याच्या
तलवारी सारखं नाही;
कोण्या पोराच्या दगडांन
झाडावरून पडलेल्या
आंब्या सारखं !
७) मिठाचा स्वाद
कवींनी, लेखकांनी
मजुदरांच्या, कामगारांच्या
घामाच्या मिठावर लिहिलं
पण चाखलं त्यांनी
मालकांनी दिलेलं
वा आपल्या प्रेयसीच्या ओठांचं मीठ
आणि निभावलंही त्याला आटोकाट !
कामगारांच्या घामाला
त्या मातीने पिऊन टाकलं
जिथे घाम सांडला होता
बस ती मातीच जाणते फक्त
कामगारांच्या मिठाचा स्वाद !
------------------------------------------------
अनुवाद - कबीर