नाशिक: ज्येष्ठ कवी, भाषातज्ज्ञ, समीक्षक तथा चंद्रपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके (Vasant Abaji Dahake) यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Foundation)अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे- पवार, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांची प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. ७) सकाळी कुसुमाग्रज स्मारक येथे झाली. उपाध्यक्ष संजय पाटील, प्रमुख कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, कोषाध्यक्ष अॅड. अजय निकम मंचावर उपस्थित होते. सल्लागार विश्वस्त हेमंत टकले, अॅड. विलास लोणारी, लोकेश शेवडे यांच्यासह विश्वस्तांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत मागील सभेचे इतिवृत्त, ताळेबंद व अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. मावळते अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर निवृत्त झाल्याने व विश्वस्तांच्या तीन जागा रिक्त असल्याने या नियुक्त्या करण्यात आल्या.
नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जनस्थान, गोदागौरव यासह अन्य कार्यक्रमांतून स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आजवर प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, न्या. नरेंद्र चपळगांवकर यांनी काम पाहिले आहे. न्या. चपळगांवकर यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदाची सूत्रे वसंत आबाजी डहाके यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला. पुढील पाच वर्ष ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.
डहाके यांचे शुभवर्तमान, योगभ्रष्ट, चित्रलिपी या कवितासंग्रहासह ललित साहित्य, वैचारिक तसेच संशोधनपर साहित्य प्रसिद्ध असून त्यांच्या साहित्याचे अन्य भाषेतही भाषांतर झाले आहे. कविवर्य डहाके यांना साहित्य अकादमी तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थानसह इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
❝कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या प्रतिष्ठानच्या कामात मला सहभागी करून घेतल्याचा आनंद आहे. २०१९ मध्ये 'जनस्थान' मिळाला तेव्हा या संस्थेच्या कामाचा जवळून परिचय झाला. तिच्या अध्यक्षपदी नियुक्ती हा माझ्यासाठी एकप्रकारे पुरस्कारच आहे.❞
- वसंत आबाजी डहाके,
नवनिर्वाचित अध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान