प्रा. नीलम यादव यांच्या पाच कविता

प्रा. नीलम यादव ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड्यासारख्या गावात राहून माणसावर आणि शब्दांवर निष्ठा ठेऊन लेखन करतात. सामान्य माणूस आणि त्यांचे भावविश्व शब्दबद्ध करणे हा यादव यांच्या कवितेचा मुळपिंड. प्रा. यादव ह्या अतिशय संथ गतीने लेखन करणाऱ्या कवयित्री आहेत. त्यांच्या मोजक्याच कविता वाचनात आल्या. ह्या मोजक्या कविता आजच्या कवितेच्या पिकांच्या मोसमाच्या खळखळाटात आपला सयंत, सखोल, सघन- आशयघन, प्रभावी स्वर अधोरेखित करतात. माणूसकेंद्री वास्तवद्ग्ध आयाम असलेली यादव यांची कविता माणसाच्या जगण्याचे ताणे - बाणे शब्दबद्ध करते.


उत्कट संवेदनशीलता आणि अनुभवाच्या सच्चेपणामुळे अवतीर्ण होणाऱ्या या कवितेतून कवयित्री शब्दांनी पाठ फिरवल्यावर होणारी जीवाची तगमग, व्यक्त होण्याची जीवाची  तडफड अतिशय भावपूर्ण शब्दात व्यक्त करतात.  माणसाच्या आत्मकेंद्री वृत्तीवर बोट ठेवतात. सयंत वृत्ती, प्रगल्भता, तीव्र संवेदना यांचा समन्वय त्यांच्या जीवनविषयक जाणिवेत आणि पर्यायाने काव्यात जाणवतो. जगण्याचा तळ खोलवर ढवळून, हाती लागलेला आशय अलगद आणि संयतपणे कवितेत मांडणे हे  नीलम यादव यांच्या कवितेचं वैशिष्ट्य !  विषयांचे वैविध्य, वेदना - संघर्षाचे नेमके आकलन हि यादव यांच्या कवितेची जमेची बाजू. मनाची होत जाणारी घुसमट बाजूला सारून मोकळा श्वास घेता यावा म्हणून वर्षानुवर्षे शब्दांशी बांधिलकी जपणाऱ्या या कवयित्रीला केवळ शब्दांचाच एकमेव आधार वाटतो. म्हणूनच कवियत्री शब्दांचा दोर घट्ट पकडून आहे. आपल्या वर्तमानाला  दुःखाचं ग्रहण लागलेल्या काळात केवळ  माणूसच माणसाला आधार देऊ शकतो, या ठाम विश्वासातून ही कवयित्री नात्याचा पदर जपू पाहते. रक्ताच्या नात्याच्याही पल्याड केवळ माणूस म्हणून एखाद्या जीवाला दुःखाच्या खाईतून वर काढू पाहणारं संवेदनशील मन रस्त्यावरच्या अनोळखी माणसासाठी मुराळी होऊन आधार देऊ पाहतं. इथल्या प्रत्येक श्वासाशी माणुसकी जपली जावी, असं या संवेदनशील कवयित्रीला वाटतं. ह्या सगळ्या संवेदनशील मनाच्या प्रतिक्रिया या कवितेत जाणवतात. ह्या एकूण सर्वच कवितांंमधील काव्यानुभूती ही निरीक्षणात्मक आणि चिंतनात्मक आहे. माणसाचं जगणं समृद्ध करणाऱ्या या कविता केवळ भावप्रधान नसून त्यात एक उमदा विचारही आहे. 

सहजता हा यादव यांच्या कवितेचं वेगळेपण अधोरेखित करणारा आणखी एक घटक. याशिवाय भाषा, आशय, अनुभव, अभिव्यक्ती आणि कला अशा सर्वच घटकामधून आकार घेणारी ही कविता विचारप्रवण आहे. केवळ वैयक्तिकच वा आत्मिक चेतनेचेच नव्हे तर आणि सामाजिक चेतनेचे अंतरंग देखील  उलगडून पाहण्याची क्षमता या कवयित्रीत आहे. त्यामुळेच यादव यांची कविता आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही दृष्टींनी व्यापक सामाजिक जाणिवेची एक महत्वपूर्ण कविता आहे. या कवितेतील अनुभूती सच्ची असून तिने कोणत्याही वादाची बांधिलकी स्वीकारली नाही. ह्या कविता निखळ माणूसपणाच्या कविता आहे. वर्तमानातील  कोलाहलाकडे, भोवतालच्या पडझडीकडे दूर कोपऱ्यात बसून शांतपणे पाहणे, एकेका घटिताचा अर्थ उकलणे या त्यांच्या प्रकृतीमुळेच त्यांच्या कवितेत स्वतंत्र चिंतन आणि विचार दिसतो. शांत, संयमित व्यक्त होणं परंतु विचारांचा गाभा मात्र धारदार, टोकदार असलेली नीलम यादव यांची कविता मराठीतील कवितांमध्ये आपला अमीट ठसा उमटवेल, असं वाटतं. थेट आशयाला भिडणारी हि कविता असून माणसांंमाणसामधील भाव संबंधाचे बोथट होत जाणे, माणसामाणसातील नाती, माणुसकीचा ऱ्हास असले दाहक वास्तव संदर्भ घेऊन ही कविता अवतरते. या कवितेत भग्नता, नि:शब्दता असली तरीही वास्तवदर्शनाच्या अभिज्ञानाने हि कविता आक्रस्ताळी न बनता, आक्रोशही न करता वा माणसावरची श्रद्धा जराही न कमी होऊ देता, गहन आणि समजूतदार बनते. त्यामुळेच ही कविता आश्वासक आहे. यादव यांची कविता माणूसपणाच्या अधिकाधिक जवळ जाणारी आहे. 

-संपादक 


१) शब्द

मौनाच्या वळचणीला मी 
बांधू पाहतेय शब्द
तरी हल्ली शब्दांना गवसत नाही माझ्या आतली दुखरी नस 
वेदनेचा प्रवाह खळखळून वाहूनण्यावा शब्दांनी
जिथे मनाची मोकळीक खुली होऊन
प्रसन्नतेचे सारे वारे 
वाहत्या पाण्यासारखे दूरवर जावेत
आणि आतला 
एखादा जीव घुसमटून टाकणारा, 
दीर्घकाळ रुतून बसलेला 
अपमानाचा खडा बाहेर पडून
घेताही यावा मोकळा श्वास
असे घडू कधी तरी यावेच
वर्षानुवर्षं जोपासत आली मी
शब्दांशी प्रामाणिक बांधीलकी
पण कित्येकदा शब्दांनी
फक्त डोकावलं मनाच्या गाभाऱ्यात
आणि अनोळखी पाहुण्यासारखे
फिरले माघारी
तेव्हा एकाद्या असाध्य आजारावर 
उपचारच सापडू नये 
अशी हतबल होत गेले मी
तरी 
आपल्याच सावलीला आपणच 
दचकून पहावं
असे दिवस सरत असतानाच
नाकातोंडात पाणी जाऊन
बुडतानाच 
शेवटच्या क्षणी 
लागावा हाताला कुठुनसा दोर
असाच वाटतोय कधी नव्हे इतका
आजही शब्दांचाच आधार.
म्हणूनच
सुचावी एखादी ओळ
जी पुरून उरेल 
सगळ्या नकारात्मकतेला
आणि दाखवेल आशेच स्वप्न
अवघ्या गलितगात्र जगाला
ज्या स्वप्नांशी माझीही बांधीलकी
स्वीकारेण म्हणतेय 
त्या शब्दांप्रमाणेच!


२) नात्याच्या शोधात

ऋतुंनी पाठ फिरवली 
आणि दिवस जरी झाले असतील फितूर
तरी श्वासांनी राखावं इमान
देहाशी काही काळ,
तापत्या उन्हाची लाहीलाही होत असेल
आणि जरी फुलांचा बहर ओसरला असेल
तरी मातीशी इमान राखत 
भर उन्हात बहरून येतातच गंधारीची फुले..
अगदी तसंच जपलं जावं नातं
कोणत्याही वळण घेत जाणाऱ्या आयुष्यात
आणि मातीची धूळ अंगाखांद्याला लावून
प्राणपणाने जपली जावी माणुसकी 
इथल्या प्रत्येक श्वासाशी.
कल्पना नसताना वर्तमान 
आणि भविष्यात
आपसूक होऊन शरण येतातही दुःखे
आपण होतो खुश
तसा वेदनेचा डंख एका क्षणात झिडकारत 
वर्तमानावर हास्याची फुले उधळत
सारा भविष्याचा काळ
कवेत घेण्यासाठी पुढे सरसावतो
तोच पुन्हा सुखाच्या चाहुलीलाही 
लागते ग्रहण 
अशावेळी स्वतःवरचा विश्वास उडू पाहतो
तेव्हाही तोलून धरावं
अवघ जगणं घट्ट करणार नातं
कारण भूत वर्तमान,भविष्य
अशा कोणत्याही काळात,
आणि कोणत्याही ऋतूत 
नात्याचा पदरच 
किमान अश्रू पुसायला तरी 
उरतो आपल्यापाशी 
नात्याचा अर्थ सरळ लावावा म्हणते-
अगदी रक्ताच्या नात्यापासून
भुकेने व्याकुळ झालेल्या वाटसरू पासून 
रस्त्यावर भीक मागत
तुमच्याशी माणुसकीचा धर्म 
जोडू पाहणाऱ्या पर्यंत.
कारण
अशाच वेळी लागत असते कसोटी
तुमच्या निधर्मी जात विरहित जगण्याची
आणि अशाच प्रसंगी मुराळी होऊन
धावून येत असतो
रस्तावरचाही बेवारशी जीव
तुमचं आयुष्य उद्धवस्थ होण्याच्या क्षणाला सावरायला.
म्हणूनच जगावसं वाटतं आता
रस्त्यावरच्या प्रत्येकासाठी
मुराळी होऊन रक्ताच्या नात्या पलीकडलं नात जपत!


३) जीवघेण्या अस्वस्थतेत पुन्हा पुन्हा

इंचाइंचाने मृत्यू जवळ येतोय
असं वाटतानाच
जीवघेण्या अस्वस्थतेतून 
पुन्हा पुन्हा मरणाची वाट स्पष्ट दिसत राहतेय.
दररोज हा विचित्र भास कुठुन होत राहतोय?
हे भयाने ग्रासलेले श्वास कोण गुदमरून टाकतोय?
विश्वासाचा एक धागाही सापडू नये
इतकी अविश्वासाची गोधडी
साऱ्या आजूबाजुला 
आपल्याच अंगाभोवती
कोणी लपेटून घेत आहे 
आणि तरीही आपण जपू पाहतोय
माणसावरचा विश्वास पुन्हा पुन्हा.
या अरिष्ट काळातील दिवसात
पशुपक्षांना असावं 
जितकं आपल्या अस्तित्वाचं भान
तेवढंही माणसाच्या आयुष्याला नसावं
एवढी हतबलता प्रचंड वाढत चाललीय .
माणूस आतून हलुन तर गेलाच आहे
पण त्याची निराशा एवढी की
निद्रानाशाच्या रात्री तो जगतो आहे
या नपुंसक होत चाललेल्या दिवसात.
म्हणूनच जगू पहातोय तळातील इथला प्रत्येक जण कसाबसा.
हातावर पोट असणाऱ्यांनी 
उचलावं अवघ जगणं
बांधून एखाद्या गाठोड्यात अन
चालावं मैलोंमैल
उद्याच्या सूर्याच्या शोधात
पण अगदी काही मोजक्या श्वासांचीसुद्धा
त्यांना वाटू नये खात्री
इतकं कसं मरण स्वस्त
होत चाललंय पुन्हा पुन्हा.
कुठून येतेय ही भयावहता?
नक्की कशा कशाची वाढत जातेय अस्वस्थता?
जिकडे पहावं तिकडे अवघ्या जगण्यालाच 
व्यापून उरली आहे मृत्यूची सावली अन
जगण्याचा फोलपणा आता जाणवू लागलाय क्षणोक्षणाला.
अशाचवेळी बुद्धाची आठवण येत राहतेय
बुध्दाशिवाय जगणं नाही, नाही मरणही
तस बुद्ध म्हणालाच होता
सगळा मोह सोडून जगत रहा
होईल विश्वाचेच कल्याण
पण आता आपली आर्त हाकही 
पोहचत नाहीय बुद्धा पर्यंत
कशाचा सूड उगवू पहातोय
आपणच आपल्यावर
कशासाठी करतोय ही 
स्वतःच स्वतःला एवढी 
जीवघेणी महामारीची शिक्षा!


४) शब्दांच वांजपण होता होत नाही सहन

शब्दचं पोरके होत गेलेल्या दिवसांकडे 
वहीतील अक्षरेही पाहताय आता 
हताशपणे 
जुन्याच भावनांना समजून घेत
जुनी तगमगही 
पुन्हा नव्याने अनुभवास येत नाही
बरं नसतं तसं
हृदय पिळवटून टाकणाऱ्या दिवसात
सुचूही नये कवितेचा एकही शब्द
हे शब्दांच वांजपण होता होत नाही सहन
आणि मुकेपणाचा कोरडा घसा तर 
हंबरडा फोडून मोकळं होण्यासाठी कासावीस झालेला
माणसाच्या दुःखाची कहाणी सांगायला
हे अपुरेपण कसे पुन्हा पुन्हा रित्या हृदय वाहत आहे
हे कसले दिवस कोसळताय नक्की 
की कुठल्या शब्दात समजवायचं बापानं
त्याच्या पोटच्या पोराला
जो तडपडतोय अन्नपाण्यावाचून
आणि एखादी माता 
तिच्या तान्ह्याला पाहुही शकत नाही डोळेभरुन कित्येक दिवस.
शेवटचा श्वास मोजताना सुद्धा
दिसत नाही डोळ्यासमोर
रक्ताचा एकही माणूस
त्याच्या वेदनेला नेमकी
कोणत्या शब्दातून वाचा फुटावी
मोकळा श्वासही घेता येऊ नये
मनभरुन
इतकं जगणं फितूर झालंय
सनातन काळापासूनच
खरं तर माणूस झेलत आलाय
निरनिराळी दुःख
आणि नामोहरम केलंय त्यानं
हरेक संकटाला
पण यावेळी मात्र
हे दुःख ओलांडू पहातयं
सगळ्याच सीमा
आणि देऊ पाहतय
आव्हान अवघ्या माणूसपणालाच.
इतिहास सांगत असतोच
तुम्हाला कायम
दिवस बदलतात, काळ बदलतो
पण माणसाने जर बदलले
आणि सोडली माणुसकी
तर तो फक्त शब्दनाच होत नाही परका 
तो होत जातोच काळाच्याही मागे कित्येक शतके स्वतःचाच गुलाम
म्हणून शब्दांचा मिळावा आधार
या सभोवतालच्या
सनातन दुःखालाआणि रुजून यावी माझ्यातील संवेदना पुन्हा पुन्हा नव्याने!


५) कोरड्या हंगामातही

वाटलं नव्हतं कधी
काळ असाही फितूर होऊन
ठाकेल उभा समोर अचानक एखाद्यादिवशी.
प्रवासात दूर कुठेतरी वणव्याचा 
लोट पाहून विस्फारलेले डोळे 
पुन्हा मिटताही येऊ नयेत
सहजासहजी
असं जीवघेणे संकट 
दरवाज्यात उभं राहील.
तुम्ही लढताय सगळ्या आयुधांसह
रक्ताचं कुठलंही नातं नसताना
जीव धोक्यात घालून
आणि फितुरांची राग तर दारातच उभी.
मुक्कामाचे ठिकाण टप्प्यात येतय
असं वाटत असतानाच
वाट मात्र दूरवर निघालीय
अनपेक्षित वळणं घेऊन
जिवाच्या आकांताने. 
हाका मारल्यावरही
जीवलगांची साधी सावलीही नाही आसपास
आणि सोबतीचे, आपले म्हणवणारेही
अचानक सोडू पाहताहेत
अगतिकतेने साथ.
आता मात्र धीर सुटत असतानाच,
तुम्हाला टाकायचय एकेक पाऊल
अगदी सावधतेने
आजूबाजूचा अंदाज घेत
दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या
शत्रूला हाताच्या अंतरावर ठेवत
चालयचंय आत्मविश्वासानं
स्वबळावर अजून काही काळ
मला विश्वास वाटतोय,
मेहनतीला फळ नक्कीच येईल
हवी असलेली हिरवळ पुढे नक्की मिळेल
तसा अगदीच पावसाळा कोरडा जात नसतो
म्हणूनच मनातील संवेदनशीलतेची पालवी 
मी कधीही मिटू देत नाही
मी निखराने लढेतेच
या व्यवस्थेच्या कोरड्या हंगामातही!

- प्रा. नीलम यादव

Previous Post Next Post