लॉकडाऊनच्या काळातील चित्राभिव्यक्ती




लॉकडाऊनचा काळ हा अनेक सर्जन दृष्टीच्या सर्जनशीलतेला वाव देणारा काळ ठरला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अनेक व्यक्त होणाऱ्यांना काहीतरी लिहायचं होतं, सुचतदेखील होतं, आत साचलेल्या गोष्टींना बाहेर काढायचं होत परंतु वेळेच्या बऱ्याच मर्यादा असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःला सिद्ध करणे सहज शक्य नसायचं. अलीकडे लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाकडे भरपूर वेळ असल्यामुळे अनेक चांगली निर्मिती रसिकदरबारी दाखल झाली. या काळाने कला, साहित्य अशा अनेक क्षेत्रांना ज्वलंत विषयदेखील दिलेत. कवी, लेखकांसह चित्रकारांच्या कुंचल्यातूनदेखील कॅनव्हासवर समकालीन भारताची वास्तव प्रतिमा साकारली गेली. म्हणूनच आपण या लेखात प्रामुख्याने सुनील अभिमान अवचार यांच्या चित्राभिव्यक्तीचा विचार करणार आहोत.

लॉकडाऊनचा काळ सुरू असताना देशात लाखो मजूर पोटाच्या भुकेच्या प्रश्नासाठी स्थलांतरित झाले. याच काळात देशातील राजकारणानेही वेगळेच वळण घेतलेले दिसून येते. यामुळे तीव्र वैचारिक संघर्ष उभा राहिला. याच समकालीन पार्श्वभूमीवर सुनील अभिमान अवचार यांनी अनेक चित्रांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रांमध्ये समकालीन परिस्थिती उमटू लागली. स्थलांतरित मजुरांना भेळसावणाऱ्या अनेक ज्वलंत समस्या त्यांनी चित्रांच्या माध्यमातून समोर आणल्या. त्यांची चित्रे आणि समकालीन भारताची परिस्थिती यांचे समीकरण अगदी अतूट आहे. जे देशात घडताना दिसत होते ते त्यांच्या चित्रांचे विषय बनलेत. या काळातील त्यांच्या चित्रांचा आशय हा अगदी ठळक दिसून आला.


लॉकडाऊनच्या काळात मजुरांचे स्थलांतर होत असताना दळणवळणाच्या साधनांच्या अभावी मजुरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात पायपीट करण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा मार्ग नव्हता. काही मजुरांनी दुधाच्या टँकरमधून प्रवास केला तर दोन युवकांनी मालवाहू ट्रकच्या मागे लटकून पुणे ते औरंगाबाद असा जीवघेणा प्रवास केला. राजेश कुमार नामक एका व्यक्तीने आपल्या परिवाराला छोले-भटुरेच्या हातगाडीत बसवून स्वतः गाडीला ढकलत नेऊन कोलकत्ता ते भागलपूर असा ५१२ किलोमीटर पायी प्रवास केला. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या यशोदाबाईने ६०० किलोमीटरचा पायी प्रवास केला. असा जीवघेणा प्रवास करत मजूर वर्ग घराच्या दिशेने होते. अनेक अडचणींना तोंड देत काही घरी पोहोचली तर काहींनी असह्य झालेल्या भुकेमुळे आपले प्राणदेखील गमावले. अशा अनेक घटनाप्रसंगावर त्यांनी चित्रे काढली.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात कित्येक मजुरांची पायी वारी महामार्गांवर दिसत होती. अशाच एका पायी चालत जाणाऱ्या महिलेचे सुजलेले पाय आणि काळोख दाटून आलेले ढग असलेले त्यांचे एक चित्र आहे. या चित्रातील महिलेचे सुजलेले पाय खूप काही बोलून जातात. तिने केलेला कित्येक दिवसांचा प्रवास प्रवास तिच्या पायांवरून लक्षात आल्याखेरीज राहत नाही. यादरम्यान रस्त्यांवर जागोजागी पोलिसांची पथके तैनात होती. रस्त्यांवरून पलायन करणाऱ्या मजुरांना कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता आपल्या संवेदनशीलतेला गहाण ठेवून या मजुरांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार केला. असा बोलका आणि संवेदनशील आशय मांडणारे चित्रदेखील त्यांनी काढले. देशातील एक जमाव स्वतःच्या पोटासाठी घराच्या दिशेने पायपीट करत निघाला असताना दुसरा जमाव मात्र आपल्या घराच्या धाब्यावर टाळ्या, थाळ्या वगैरे वाजवण्यात दंग होता. हा आशयदेखील त्यांनी चित्रातून टिपला. याचदरम्यान मजुरांची ही न संपणारी पायपीट सुरूच असताना हाच टाळ्या वाजणारा जमाव पुढे दिवे लावू लागला. या दिव्यांमध्ये जळणारे मजुरांचे काळीज त्यांनी चित्रातून साकार केले. याच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि वैचारिक संघर्ष घडून आला. डोक्यावर एका टोकरीत धर्मचिन्हे वाहून नेणारा मजूर म्हणजे जणूकाही इथल्या व्यवस्थेने त्याला धर्माचा हमाल बनवून ठेवलाय, असा आशय त्यांचे चित्र व्यक्त करते. असाच आशय त्यांनी दुसऱ्या एका चित्रातही व्यक्त केला आहे. धर्मचिन्हांच्याखाली दाबल्या गेलेल्या माणसांचे चित्र विचार करायला भाग पाडते. याच चित्रातील मुक्त विहार करणारा पक्षी आणि धर्माच्या प्रदूषणात दूषित झालेली माणसं असा महत्त्वाचा भेद त्यांनी स्पष्ट केलेला आहे.

लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे प्रत्येक माणूस आपापल्या घरात कैद होता. त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून सरकारने रामायण, महाभारत या मालिका पुन्हा सुरू केल्या. खरंतर इतरही वैचारिक मालिका होत्या. त्यांनी ठरवलं असतं तर त्यादेखील सुरू करू शकले असते. परंतु त्यांना ज्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करायचा होता, त्याच गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले. या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी काढलेले पायपीट करत डोक्यावर रामायण असलेली टीव्ही घेऊन भुकेच्या दिशेने चालणारी महिला आणि तिच्या कडेवर असलेले कुपोषित बालक हे चित्र अगदी अस्वस्थ करणारे आहे.

औरंगाबादजवळ रेल्वेरुळावर जीव गमावलेल्या मजुरांची घटना संवेदनशील मनाला अगदी अस्वस्थ करणारी होती. या घटनेवरही त्यांनी काही चित्रे काढलीत. पाय फुटलेली रेल्वे, रेल्वेरुळाला खांद्यावर नेऊन कोसणारा मजूर वर्ग, रेल्वेरुळाने चोहू बाजूने मजुरांना बांधून ठेवलेली स्थिती अशा अनेक चित्रांमध्ये सुचकता स्पष्ट झालेली आहे. लॉकडाऊन काळातील धारावीची वास्तव परिस्थितीही त्यांच्या संवेदनशील मनाने टिपली.

सुनील अभिमान अवचार यांची समकाळात निर्मित झालेली चित्रे ही मजुरांच्या वास्तव परिस्थितीचा आशय मांडणारी आहेत. मजुरांच्या वास्तव जगण्याचे संदर्भ त्यांच्या चित्रातून उमटताना दिसतात. अंग झाकायला पुरेशी कपडे नसलेली ही चित्रे खूप बोलून जातात. मजूर, भूक, भाकर अशा महत्त्वाच्या आशयांभोवती त्यांचे चित्र फिरते. अशी अनेक चित्र त्यांनी काढली. म्हणून सुनील अभिमान अवचार हे समकाळातील महत्त्वाचे चित्रकार वाटतात.

- तुषार पाटील निंभोरेकर

Previous Post Next Post