प्रास्ताविक :
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समुहामध्ये राहुनच मानवाने आपला सर्वांगिण विकास साध्य केला आहे. जेव्हापासून मनुष्य माणसामाणसात भेद करायला लागला तेव्हापासुन असमानतेची ही श्रृंखला तयार झाली आहे. ही असमानता प्रदेशानुसार वेगवेगळी आहे. यामध्ये रंग, जात, बोली, धर्म, पेहराव, स्त्री-पुरुष इत्यादी कारणावरुन भेदाभेद कण्यात येतो.
शेषराव पिराजी धांडे हे आबेडकरी जाणिवेंचे कवी आहेत. सामाजीक, राजकीय, धार्मिक इत्यादी बदलणाऱ्या परिस्थितीवर ते आपल्या कवितेतून भाष्य करतात. या कवितेतून ते मानवी हक्काची बाजू लावून धरतात. संविधानिक मुल्ये आपल्या कवितेतून रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांची कविता कोणत्याही एका चौकटीत अडकत नाही. त्यामुळे समग्र मानव समुदायाच्या हक्का विषयी ती बोलते. सदर विषयासाठी धांडे यांच्या ‘रस्ता सोडून चालला कुठं?’ ‘आमचा आलेख कोराच..!’ आणि ‘बिघडलेल होकायंत्र’ या तीन कवितासंग्रहाचा अभ्यास करण्यात आला आहे.
शोधनिबंधाची उद्दिष्टे :
१) शेषराव धाडे यांच्या कवितेत आलेल्या मानवी हक्कांचा अभ्यास करणे.
२) धांडे यांच्या कवितेतील समकालीन परिस्थितीची मांडणी करणे.
३) मानवी हक्कातीला सामाजीक संघर्ष समजून घेणे.
४) कविच्या विचारांचा अभ्यास करणे.
५) कवितेतून व्यक्त झालेल्या विविध जाणिवांची मांडणी करणे.
मानवी हक्क :
थोडक्यात सांगावयाचे तर “व्यक्तीला जन्मापासून सन्मानाने आणि स्वातंत्रपणे जगण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत अधिकार म्हणजे मानवी हक्क होय.” हे हक्क व्यक्तीला प्रतिष्ठेने जगण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. या हक्कामुळे आत्मसन्मान प्राप्त होतो. व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी जीवनात समानता येण्यासाठी मदत होते.
“मानव जातीचे मूळ माणूस आहे” हे मार्क्सचे वाक्य प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्ध नंतर जगाने मानवी हक्काचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली त्यामुळेच १९४६ साली मानव आयोग स्थापन करण्यात आला. १० डिसेंबर १९४८ रोजी आयोगाने मानवी व्यक्तीला सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकार बहाल केले. या सर्व अधिकारापासून कोणीच वंचित राहणार नाही, याची ग्वाही दिली. या सनदेत ३० कलमे आहेत. यामध्ये जीवन जगण्याचा अधिकार, गुलामीपासून मुक्तता, भाषण, स्वातंत्र्य, सुनावणीचा अधिकार, समता, धार्मिक अधिकार, शिक्षण इत्यादी बाबींचा समावेश आहे.
मनुष्याला या मानवी हक्काची गरज का पडली ? या प्रश्नाचा शोध घेत असताना व्यक्तीने व्यक्तीवर केलेला अन्याय आपल्याला दिसून येतो. आजही आपल्याकडे जन्मजातीवरून समाजात भेदाभेद केल्या जातो. पाश्चात्य देशात व्यक्तीच्या शरीराच्या रंगावरून भेदाभेद केला जातो. ही असमानता समाजामध्ये आजही आहे. समाजात आर्थिक दरी मोठ्या प्रमाणात आहे. स्त्री पुरुष भेदभाव आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देश एकमेकांसमोर शत्रू म्हणून उभे आहेत. सध्या रशिया आणि विक्रम युद्ध मागे पडत होते तेव्हाच इस्राईल आणि हमास यांच्या युद्धाने मानवी हक्काला बाधा पोहोचवली आहे. आपल्या भारताचा विचार करायचा झाल्यास इथे जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतो; त्यामुळे मानवी हक्क अबाधित ठेवणे ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
कवितेतून अभिव्यक्त झालेले मानवी हक्क :
शेषराव पिराजी धांडे हे नव्वोदोत्तरी कालखंडातील कवी आहेत. त्यांच्या कविता सामाजिक आशय व्यक्त करतात. त्यांच्या कवितेची बांधिलकी समाजाशी आहे. ही कविता समाजाचा आरसा आहे. यामध्ये बरे वाईट सर्वच अनुभव मांडले आहेत. आपल्या मनातील कोलाहल बाहेर काढण्याचे प्रभावी माध्यम कविता होय आणि त्याचा पुरेपूर वापर कवीने आपल्या कवितेतून केलेला आहे. कवी मानवी मूल्याची मांडणी करतो याचा अर्थ कवीला संविधानिक मूल्याची जाण आहे. त्यामुळे समता, स्वातंत्र्य, अभिव्यक्तीची पुनर्मांडणी कवीने आपल्या कवितेतून केली आहे. कवी प्रामुख्याने मानवी हक्काविषयी आपल्या कवितेतून बोलतो.
कवी आपल्या “बिघडलेले होकायंत्र” या कवितासंग्रहातील ‘समानता पेरलेल्या मातीत’ या कवितेत म्हणतो की,
“सनातन्यांनी बहिष्कृत करण्याचा केला ठराव
योग्यता असूनही निवड ठरवली अयोग्य
त्यांच्या अहंकारी वृत्तीने केला कहर
घटनेच्या कलमाला वापरले सोयीने” (पृ. २७)
उपरोक्त कवितेत कवी समानतेविषयी बोलताना दिसतो. या कवितेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वर्णव्यवस्थेची मांडणी आपल्या समाजात आधीपासूनच आहे; त्याची होणारी अंमलबजावणी कवीने सदर कवितेत व्यक्त केलेली आहे. बहिष्कृत करणे याचा अर्थ समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटणे होय. मग ती व्यक्ती कितीही योग्य असली तरी तिला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवले जाते. या कवितेतून कवीने समकालीन सामाजिक परिस्थितीचे वर्णन केले आहे ज्याचा अनुभव इथला शोषित समाज प्रामुख्याने घेताना दिसतो.
सध्याच्या घडीला आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा होऊन बसला आहे. मानवी हक्काच्या दृष्टीने विचार करावयास हा मुद्दा भाग पाडतो. त्यासाठी आरक्षण कशासाठी दिल्या गेले आहे, हे आपल्याला समजून घ्यायला हवे. सामाजिक असमानता दूर करण्यासाठी वंचित आणि मागासमूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. स्वातंत्र्य भारतात ही समानतेची नवीन वाटचाल ठरली आहे; परंतु याच समानतेच्या विरोधात काही विचार प्रवाह काम करताना दिसतात. त्यामुळे मानवाच्या मानवी हक्कावर हा आघात होताना दिसतो. त्यासाठी कवी आपल्या ‘पोटात दुखणाऱ्यांनी उपचार करावा मेंदूचा’ या कवितेत आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट करतो.
“कुठलाच मौसम मेहरबान नव्हता आमच्यावर
चिमूटभर आकाश मिळालं
म्हणून पूर्ण स्वातंत्र्य मिळालं असं नव्हे…(पृ.३०)
मानवी हक्क आपल्याला सामाजिक तसेच राजकीय स्वातंत्र्य बहाल करतात परंतु भारतीय समाज जाती व्यवस्थेमध्ये एवढा गुरफटला आहे; त्यामुळे विषमता अजून खोलवर रुजत आहे. त्याचे प्रतिबिंब ‘काळोख, वर्तमानकाळ आणि शासनव्यवस्था’ या कवितेत दिसून येते.
“अंधाराने घेतला उजेडावर ताबा
अख्खं गाव झालं भयग्रस्त
जुलमी राजवटीतील हुकूमशहा सिंहासनावर आहे विराजमान
दंगल घडवणारा बाजारबुणगा फिरतो राजरो” (पृ.३९)
सदर कवितेत प्रतिमांचा वापर मोठ्या खुबीने केला आहे. ‘अंधार आणि उजेड’ या प्रतिमांना अनुक्रमे संविधानिक मूल्य न मानणारा विचार आणि संविधानिक मूल्य मानणारा विचार यांच्या उपमा दिलेल्या आहेत. म्हणजे काय तर मानवी हक्क नाकारणारा अंधार आणि मानवी हक्क मानणारा उजेड अशा या प्रतिमा आहेत. लोकशाहीमध्ये जनता सर्वस्वी असली तरी जनतेची भूमिका फक्त मतदान करण्यापूर्वी मर्यादित आहे. मग त्यानंतर सत्तेवर आलेला व्यक्ती जर हुकूमशाही पद्धतीने वागला तर जनता तेव्हा काहीही करू शकत नाही; जोपर्यंत पुढील निवडणूक होत नाही. आता वरील कवितेत सिंहासनावर हुकूमशहा विराजमान झाला आहे असे कवी म्हणतो त्यामुळे तिथे मानवी हक्कावर गदा आली आहे. कारण हुकूमशाही मध्ये हुकूमशहा व्यक्ती सर्वोच्च असतो आणि जनता दुय्यम. कवीला या कवितेत असे सांगायचे आहे की, मानवी हक्काची पायमल्ली झाली आहे परंतु त्यासोबतच ही परिस्थिती बदलण्याचा आशावाद कवीने पूर्ण कवितेत व्यक्त केला आहे.
आपण सर्व एक मनुष्यप्राणी असून सुद्धा सर्वांची परिस्थिती सारखी नसते. याचे वर्णन ‘तिरंगा आणि सलामी’ या कवितेत कवी करतो. आपल्या कवितेत कवी म्हणतो की,
“तुझं आयुष्य हिरव्यागार गालिच्यासारखं सजलेलं
माझ्या आयुष्याचाचं झाला उन्हाळा” (पृ.४७)
इथल्या सामाजिक असमानतेचा एक धागा कवीने येथे मांडला आहे, जो मानवी हक्कापर्यंत घेऊन जातो. प्रत्येकाची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. याचे कारण तपासले तर वर्ण आणि जात व्यवस्था याच्या मागे आहे हे आपल्याला अभ्यासांती समजून येईल.
मानवी हक्काच्या तरतुदीत आर्थिक हक्क बहाल केले आहेत. भारतीय समाज व्यवस्थेत आर्थिक दरी फार मोठी आहे. या आर्थिक दरीमुळे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. काही मोजका वर्ग आपले आयुष्य अती श्रीमंतीत जगत आहे आणि बहुसंख्य वर्ग आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी रोज नवीन संघर्ष करत आहे. यामुळे मानवी हक्कात आर्थिक हक्काची मांडणी केली आहे. हीच मांडणी कवी आपल्या “रस्ता सोडून चालला कुठं” या कविता संग्रहातील ‘मोर्चा’ या कवितेत करतो. कवी म्हणतो की,
“प्यायला पाणी नाही
आमच्या पोटात
अन्नाचा कण नाही
तुम्ही म्हणता मोर्चात सामील व्हा” (पृ. १९)
या कवितेची मांडणी कवी आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून करतो. यामध्ये मानवी हक्काचा विचार प्रामुख्याने पुढे आणला आहे. त्याचबरोबर या मानवी हक्काला सामाजिक संघर्षाची जोड आहे. ज्या व्यक्तीला प्यायला पाणी आणि खायला अन्न नाही याचा अर्थ तो आपल्या आर्थिक गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नाही. मग ही आर्थिक असमानता असण्याचे कारण काय ? तर त्या व्यक्तीची सामाजिक मागासता होय. सामाजिक दृष्ट्या ती व्यक्ती मागास आहे त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सुद्धा ती व्यक्ती मागास राहिलेली आहे. सामाजिक बाबी आणि आर्थिक बाबी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यामुळे आर्थिक गरजा पूर्ण होत नसतील तर सदरहू व्यक्ती मानवी हक्काच्या अधिकारापासून वंचित आहे, असे समजावे. एवढी मागासता असेल तर ती व्यक्ती सामाजिक लढ्यात कशी सहभागी होईल ? जर त्या व्यक्तीला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती मानवी हक्कापासून वंचित राहील. भारतात आर्थिक बाबी सामाजिक स्तरावरून ठरतात. या कवितेत कवी मानवी हक्कासाठी सकारात्मकता मांडतो ते कवीच्या ‘मुर्दाबाद’ या घोषणेवरून आपल्याला स्पष्ट जाणवते.
संविधानाने समानता प्रस्थापित केली असली तरी पण अजूनही समाजात जातीयता दिसून येते. ही जातीयता पूर्वीसारखी आता उघड नसली तरीही लोकांच्या मनात ती अजूनही आहे. सामाजिक जीवनात याचा प्रत्यय वारंवार येताना दिसतो. मानवी हक्कात सामाजिक अधिकार बहाल केलेले असले तरी पण समाजात फार मोठ्या प्रमाणात फरक पडलेला नाही. याचे उदाहरण कवी आपल्या ‘रूप बदललं जातीयतेच’ या कवितेतून देतो.
“ऑफिसमधील सहकाऱ्याच्या घरी
चहापाण्यासाठी गेलो
त्याचं आतिथ्य पाहून मी पार भारावलो
चहा ऐवजी चक्क कोल्ड्रिंक्स पाजलं!
उशिराने कळलं-
घरातील भांड्यात चहा देण्याचं टाळलं. (पृ.४७)
भारतीय व्यवस्थेत कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीच्या व्यक्तीच्या स्पर्शाचा विटाळ मांणण्यात येतो. हाच विटाळ कवीने वरील कवितेत मांडला आहे. त्याला अस्पृश्यता असे म्हणतात. प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायला हवे की, जातीयता कायद्याने नष्ट झाली तरीही लोकांच्या मनात ती आजही कायम आहे आणि लोक ती छुप्या पद्धतीने पाळतातही. अशी लोकं जी जातीयता पाळतात ती लोक संविधान मानत नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. भारतीय संविधानातील कलम १४ ते १८ या कलमात समानता प्रदान करण्यात आली आहे. तर कलम १७ मध्ये अस्पृश्यता निवारण आहे. भारतीय संविधान नाकारणे म्हणजे मानवी हक्क नाकारणे होय. वरील कवितेतून कवी जातीयतेचे वास्तव स्पष्ट करत आहे. सामाजिक अधिकार कशा पद्धतीने तुडविले जातात याची मांडणी कवीने केली आहे. त्यामुळे वरील कवितेत कवीने मानवी हक्कासोबत संविधानिक मूल्यांची सुद्धा मांडणी केली आहे परंतु ही मांडणी करताना कवीने समाजातील वास्तव आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही मांडणी करताना कवीने अस्पृश्यता पाळण्याच्या पद्धती कशा पद्धतीने बदललेल्या आहेत याचे उदाहरण सदर कवितेतून मांडले आहे. त्यामुळे कवी कडे असलेला सामाजिक दृष्टिकोन आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. ही सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने बदलत आहे आणि बदललेली आहे याची मांडणी सुद्धा कवीने वरील कवितेतून केली आहे.
समारोप :
शेषराव पिराजी धांडे हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कवी आहेत. त्यांनी आपल्या विविध कविता संग्रहातून सामाजिक कविता लिहिल्या आहेत. काही कवितांना राजकीय स्पर्श आहे. त्यांच्या कवितेतून मानवी हक्काचा विचार प्रामुख्याने प्रकट होतो. ते सामाजिक भाष्य करतात. समाजातील असमानतेवर ते बोलतात. सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करतात. त्यांच्या कवितेतून समानतेचा आणि मुक्त स्वातंत्र्याचा विचार पुढे आलेला आहे.
कवी धांडे यांनी आपल्या कवितेतून ऐतिहासिक संदर्भ प्रतिमांच्या रूपाने सादर केले आहेत. कवीने आपले विचार खूप सौम्यपणे लोकांच्या समोर मांडले आहेत. कवीने बदलणारी सामाजिक परिस्थिती सुद्धा आपल्या कवितेतून मांडली आहे. संविधानिक लोकशाहीमध्ये सर्वांच्या मताला किंमत आहे. त्यामुळे आपल्या मानवी हक्काबद्दल कवी प्रामुख्याने बोलताना दिसतो. कवीची मांडणी नवविचारातून झालेली आहे असे आपल्याला जाणवते. मानवी हक्काची मांडणी कवितेतून करणे हे अवघड काम कवीने खुबीने केले आहे, याचे कारण कवीकडे असलेल्या सामाजिक परिस्थिती बद्दलचा अभ्यास होय.
१९१० च्या सुमारास इंग्रजी कवितेत निर्माण झालेल्या कवितेला ‘न्यू पोएट्री’ असे म्हटले जाऊ लागले. अशाच नवविचारांची मांडणी धांडे यांनी आपल्या कवितेतून केलेली आहे. परंतु त्याचा आशय आणि विचार आंबेडकरी आहे. सदरहू कवितेत आंबेडकरी जाणिवा प्रामुख्याने पाहावयास मिळतात.
मानवी हक्क आणि संविधानिक मूल्य यांची सांगड कवीने आपल्या कवितेतून घातलेली आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ याला जोडणारा दुवा म्हणजे शेषराव धांडे यांची कविता होय. ही कविता मानवी हक्काच्या अधिकाराचा पुरस्कार करते, असे आपण ठामपणे सांगू शकतो.
संदर्भ सूची :
१) स्टेट लेवल कॉन्फरन्स ऑन ह्युमन राइट्स अँड पीस,
ऑर्गनाईज बाय महिला महाविद्यालय, अमरावती,
२९ सप्टेंबर २००१
२) कविता आणि प्रतिमा, सुधीर रसाळ, मौज प्रकाशन गृह, मुंबई, जून १९८२
३) कवितेतील आधुनिकवाद, डॉ. केशव सद्रे, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, जाने. २००२
४) दलित स्त्रिया आणि मानवी हक्क, अभिनया रमेश, सुगावा प्रकाशन, पुणे
- हेमंत दिनकर सावळे
जि. वाशिम
संशोधन विद्यार्थी,
संशोधन केंद्र : मराठी विभाग,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती