संघर्षाची घसघशीत रक्कम मोजताना
अंदाजांच्या सगळ्या आयन्यांवर
धूळ साचत चालली शंकाकुशंकांची
क्षितिजाआड दडलेला षडयंत्री सूर्य
देतो उगवण्यास नकार स्पष्ट
धष्टपुष्ट रात्र
अन दिवस हडकुळा झाल्याचा
आपण पिटत बसतो डांगोरा
कंगोराही घासत नाही
संदिग्धतेच्या हट्टी घुमटाचा
पूर्वी दिवसांच्या निर्मळ चेहऱ्यावर
नांदायची एक विलक्षण शांती
त्या शांतीच्या दयाळू छटा
उमटायच्या गावभर विनासायास
जे शहरे सोडून निघाले गावच्या रोखाने
त्यांना कुठे माहीत
तिथेही सणाणत आहे परकेपणाचा वारा
थारा मिळाला वाटेत रात्रीपुरता
तर ते मातीच्या आठवणीने
हंबरडा फोडत आहे गायीसारखा
त्यांच्या आकांताने दणाणत आहे आसमंत
अद्याप थांबला नाही
एका अदृष्य काठीचा पाठलाग
मोकळीक मिळते अधूनमधून
पाठीवरच्या वळाची
मोजदाद करता यावी म्हणून
आता आता मोजमापातही
व्हायला लागली सरमिसळ
आधी आणि नन्तरच्या वळाच्या
ओळखीच्या गोंधळाचा
कायम आहे तिढा
विडा उचलताच येत नाही
सरसकट आकलनाचा
साखर कारखाण्यातून
सोडलेली मळीची लाट
नदीच्या शुद्ध पाण्यात मिसळावी
भोवताली दुर्गन्ध उधळत निघावी बेभान
अशी होत चालली जीवनशैली रोगट
संघर्षाची घसघशीत रक्कम मोजल्यावर
अनुभवाचे वेडेवाकडे घाव सोसल्यावर
आता आता आला आकार
सापत्न वागणूक देणाऱ्या
सतत पाण्यात पाहणाऱ्या
आयुष्याच्या नजरेत भरणारा
तर सरसावत आहे नासधूस
विंचवासारखी नांगी उंचावत
- अजीम नवाज राही
-----------------------------------
परिचय -
अजीम नवाज राही (इ.स. १९६५ -) हे मराठी भाषेतील लेखक आणि कवी आहेत. महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारासह अन्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 'व्यवहारांचा काळा घोडा', 'कल्लोळातला एकांत', 'वर्तमानाचा वतदार' हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांचे इंग्रजी तसेच हिंदी भाषेतही अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या मराठी पुस्तकात आधी ‘दुष्काळ’ नंतर ‘पडझड’ या दोन कवितांचा समावेश केला. शिवाय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती या विद्यापीठातही त्यांच्या कविता अभ्यासाला आहेत. सध्या राही हे पैनगंगा सहकारी सूत गिरणी येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.