'हिंदू'च्या पंगतीतलं पान


'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस'ने आयोजित केलेल्या भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' कादंबरीवर आधारित कादंबरी लेखन स्पर्धेत, 'पंगतीतलं पान' या कादंबरीला एकमेव विजेतेपदाचा सन्मान लाभला. लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर असलेल्या या कादंबरीच्या निर्मितीमागची खुद्द लेखकाने सांगितलेली गोष्ट... 




'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’, मुंबईतर्फे अनेकदा कादंबरी स्पर्धा आयोजित केलेली आहे. अशा स्पर्धांतूनच जयवंत दळवींची ‘चक्र’‚ भानू काळेंची ‘तिसरी चांदणी’, मनोहर तल्हारांची ‘माणूस’ वगैरे कादंबऱ्या रसिकांसमोर आल्या होत्या. मात्र जुलै २०१८ च्या ‘ललित’च्या अंकात प्रकाशित झालेली ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा‘ अनेक कारणांनी अभूतपूर्व होती.  या स्पर्धेची पहिली अट म्हणजे एक कादंबरी वाचून त्यावर कादंबरी लिहायची. ती कादंबरीसुद्धा साधीसुधी नाही तर नेमाडे सरांची ‘हिंदू’‚ जी प्रकाशित होण्याअगोदरपासून तसेच प्रकाशित झाल्यानंतर सतत चर्चेत राहिलेली कादंबरी. 


दुसरी अट अधिक जीवघेणी होती. 'हिंदू’चा पूर्वार्ध लिहायचा नाही तसेच उत्तरार्धसुद्धा लिहायचा नाही. ‘हिंदू’त असंख्य उपकथानकं आहेत. त्यातले एखादे निवडून त्यावर स्वतंत्र कादंबरी लिहायची. तिसरी तांत्रिक अट म्हणजे - स्पर्धेसाठी जर कादंबरी लिहायचीच असेल तर स्पर्धकाला सहा महिन्यांचा कालावधी मिळाला होता. म्हणजे, स्पर्धेत कादंबरी पाठवण्याची शेवटची तारीख होती ३१  डिसेंबर २०१८ !

 
'ललित’च्या असंख्य वाचकांप्रमाणेच मीसुद्धा ही जाहिरात वाचली आणि ताबडतोब दुर्लक्ष केले. एक तर ‘हिंदू’ वाचून  पाचसहा वर्षं झाली होती. शिवाय माझी प्रत ‘महिन्याभरात वाचून देतो’ म्हणुन नेलेल्या सद्गॄदस्थाने आजतागायत आणून दिलेली नाही. ‘हिंदू’ वाचता वाचता एवढी दमछाक झाली होती तर त्यावर आधारित कादंबरी लिहायची म्हणजे किती शेर दूध प्यावे लागेल‚ असा विचार मनांत चमकून गेला. मुद्दा काय तर ‘ललित’ मधली जाहिरात वाचल्यावर पहिली प्रतिक्रिया होती ‘भिडू‚ इसमे हात डालेना का नही. चुपचाप पतली गलीसे निकल जा’. 


असाच जुलै महिना गेला. ऑगस्ट महिन्यात एक दिवस मनाने उचल खाल्ली आणि एका तिरीमिरीतच ‘हिंदू’ विकत आणली. आता वाचन सुरू झाले. पहिल्यांदा ‘हिंदू’ वाचली तेव्हाचा अनुभव आणि आता ‘हिंदू’ वाचत होतो हा अनुभव‚ यात जमीनअस्मानचा फरक होता. पहिल्यांदा वाचली तेव्हा वाचक म्हणून वाचली होती आणि आता वाचत होतो तेव्हा यातले कोणते उपकथानक आपल्या फुलवता येईल, दॄष्टीने वाचत होतो. या प्रक्रियेत साहजिकच वेळ जास्त लागत होता. त्या प्रमाणात माझी अस्वस्थता वाढत होती. मध्येच आपण हे काय खुळ डोक्यात घेतले आहे‚ असेही विचार त्रस्त करत होते. या गतीने ऑगस्टच्या अखेरपर्यंत हिंदू वाचून झाली.  नेमाडेंची भाषा‚ त्यांचे कथानक रचण्याचे कौशल्य‚ वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता… यामुळे मी दुसऱ्यांदासुद्धा दिपून गेलो होतो. मनांत नकारात्मक विचार येत होते. कशाला शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करायचा ? जमणार नाही.  त्यापेक्षा आपल्याला पाहिजे त्या विषयावर लेखन करावे‚ असाही विचार येत होता. 


मी स्वत:ला जाणिवपूर्वक यापासून दूॄर ठेवण्याचा प्रयत्न केला पण मनाच्या अबोध पातळीवर काम सुरू होते. एके दिवशी सकाळी सरळ लॅपटॉप  उघडला आणि दोनअडीच तासांत हजारबाराशे शब्दं लिहून काढले. नंतर संध्याकाळी मी सकाळी लिहलेले शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे वाचून काढले. तेव्हा जाणवलं की हे जमू शकेल. प्रयत्न करायला हरकत नाही. तोपर्यंत ऑगस्टचा दुसरा आठवडा संपत आला होता. मी गणीत केले.  दररोज कमीत कमी आठशे शब्दं लिहले तर १० डिसेंबरपर्यंत लाखभर शब्दं लिहून होती. पुढचे दहा दिवस म्हणजे २० डिसेंबरपर्यंत स्वत: संपादन करू आणि पुढच्या आठवडयात म्हणजे २७ डिसेंबरपर्यंत शेवटचा हात फिरवून प्रिंट आऊट काढता येतील. २८ डिसेंबर किंवा उशिरात उशिर म्हणजे २९ डिसेंबरपर्यंत ‘मॅजेस्टिक’च्या गिरगावच्या कार्यालयात नेऊन देता येेेईल. प्राध्यापक होण्याआधी मी मुंबईतील अनेक प्रतिष्ठित जाहिरात कंपन्यांमध्ये नोकरी केलेली असल्यामुळे ‘बॅकवर्ड प्लॅनिंग’ हा प्रकार व्यवस्थित माहिती होता.


दुसरे दिवशीपासून सकाळी लेखन सुरू केले. कमीतकमी आठशे शब्दं. लिहल्याशिवाय लॅपटॉप बंद करायचा नाही‚ हा नियम काटेकोरपणे पाळला. 


लिहितांना डोळ्यांसमोर बुलढाणा जिल्हयातील छोटंसं खेडं‚ फुलगाव दिसत होते‚ धांडे पाटलांचा वाडा दिसत होता‚ तिथे वावरणारी लोकं‚ त्यांचे परस्परसंबंध‚ त्यांच्यातले रागलोभ‚ हेवेदावे‚ संपत्तीसाठी होत असलेले कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट वाद दिसत होते. 


लेखन झपाट्याने सुरू होते. हे सर्व रंगवणे तसं सोपं होतं. कठीण होते ते कथानकातील जातीव्यवस्था आणि या व्यवस्थेचे कथानकातील अपरिहार्य स्थान.  कथानकातील मध्यवर्ती पात्रं म्हणजे (‘नायक’ असा शब्दप्रयोग मी वापरत नाही‚ वापरू शकत नाही. मला ही संकल्पनाच मान्य नाही.) गुलाब धांडे - पाटील.  हा तरूण मुलगा आहे‚ अविवाहित आहे आणि गेली पाचसहा वर्षं उच्च शिक्षणासाठी पुणे‚  मुंबई आणि आता दिल्लीत आहे.  गुलाबला जातीव्यवस्था नाकारणारी आधूनिक‚ पुरोगामी मूल्यं मान्य आहेत. एवढंच नव्हे तर तो त्या मूल्यांना प्रमाण मानून आंतरजातीय‚ आंतरधर्मीय लग्न करायलासुद्धा तयार आहे. असे सर्व घटक अनुकूल असूनही गुलाबला शेवटी जातीतच लग्न करावे लागते. असा त्याचा प्रवास.  एक पात्र म्हणून गुलाब वाढत होता आणि मी लेखक म्हणून निमुटपणे त्याच्या मागेमागे जात होतो‚ त्याची ओढाताण तटस्थपणे टिपत होतो. यात कुठेही आक्रस्ताताळेपणा येणार नाही‚ याची पदोपदी काळजी घेत होतो. या दरम्यान गुलाबचा आणि माझा जातीव्यवस्थेच्या चिवटपणाबद्दल अनेकदा संवाद व्हायचा.  महात्मा फुले‚ महात्मा गांधी‚ डॉ. बाबासाहेब आंबेडकरासारख्या अनेक महामानवांनी जातीव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. तरी आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातही जात, जात नाही.  ‘जाता जात नाही ती जात’ हे टाळीचं वाक्य म्हणून घ्यायचं की कठोर वस्तुस्थिती? 


मी वेळापत्रकाप्रमाणे कादंबरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडयात हातावेगळी केली. संगणकावर काम केले म्हणजे नेमकं शब्द किती लिहले याचा अचूक आकडा समोर दिसतो.  ९३ हजार ४५२ शब्दं लिहले होते. खुप वर्षांपूर्वी ‘ललित’च्या अंकात माधव मनोहरांनी मॅक्सवेल पर्किन्स या नामंवत संपादकावर दीर्घ लेख  लिहिला होता. पर्कीन्सने थॉमस वुल्फ या अमेरिकन कादंबरीकाराची ‘लूक होमवर्ड‚ एंजल’ ही सुमारे साडेतीन लाख शब्दांची कादंबरी काटछाट करत सुमारे ६० हजार शब्दांत बसवली. हे डोळ्यांसमोर ठेवत मी कादंबरी दोनतीनदा वाचून काढली आणि ही कादंबरी ४५ हजार ६८५ शब्दांत बसवली.  वास्तविक पाहता ‘मॅजेस्टिक’च्या स्पर्धेत शब्द मर्यादेचं बंधन नसेल‚ असे स्पष्ट नमुद केले होते. पण दुसऱ्यांदा‚ तिसऱ्यांदा केलेल्या वाचनात मला काही ठिकाणी कादंबरी ढिली पडल्याचे तर काही ठिकाणी पुनरावॄत्ती होत असल्याचे दिसले. कधी काळी ‘माणूस’चे संपादन करतांना श्री. ग. माजगावकरांनी संपादनाच्या दिलेले धडे डोक्यात होते. 


कादंबरीची प्रिंट काढली‚ व्यवस्थित फाईलमध्ये घातली आणि २९ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता गिरगावातल्या ‘मॅजेस्टिक’ मध्ये नेऊन दिली. जिना उतरतांना मनावरचं मोठे ओझे उतरल्यासारखे वाटत होते.  गिरगावात एका ठिकाणी चहा घेत असतांना अकोलानिवासी मित्र आणि कथालेखक डॉ.  दिवाकर कॄष्ण आचार्याला फोन केला आणि सांगितले ‘तीन बक्षीसं आहेत. मला पहिले किंवा दुसरे बक्षीस नक्की आहे.’ डॉ. आचार्य विदर्भातला असल्यामुळे त्याला नांदुरा‚ खामगांव‚ शेगांव‚ अकोला वगैरे परिसर‚ तेथील लोकजीवन‚ भाषा वगैरे माहिती होते. 


कादंबरीचे शिर्षक ठरत नव्हते.  गुलाब धांडे - पाटलासमोर असलेली परिस्थिती‚ त्या परिस्थितीचा त्याच्यावर आलेला दबाव आणि शेवटी त्याने सारासार विचार करून घेतलेला निर्णय बघता‚ तो सोडून गेलेल्या पंगतीत परत येतो… असा आशय व्यक्त करणारे शिर्षक असावे असे वाटत होते आणि यातूनच ‘पंगतीतलं पान’ हे शिर्षक नक्की केले. रवीमुकुल यांनी केलेल्या कादंबरीच्या मुखपॄष्ठात हा मूड अचूक पकडला आहे. 


२०१९ सालच्या पाडव्याच्या दिवशी ‘मॅजेस्टिक’च्या अशोक कोठावळे यांचा फोन आला आणि मला पहिले बक्षीस असल्याचे सांगितले. नंतर कळले की जेष्ठ कथाकार मधू मंगेश कर्णिक‚ प्रा. डॉ. खोले आणि प्रा. रंगनाथ पठारे या तिन दिग्गजांची निवड समिती होती आणि समितीने एकमुखाने माझ्या कादंबरीची पहिल्या बक्षिसासाठी शिफारस केली. 


आता कधी कोरोना जातो आणि कधी कादंबरी वाचकांसमोर येते असे मला झालेले आहे. नेमाडे सरांच्या ‘हिंदू’ वर आधारित कादंबरी स्पर्धेत मला पहिले बक्षिस मिळाले याचा मला सार्थ अभिमान आहे. 

                                      
- अविनाश कोल्हे

(सौजन्य - म.टा) 
Previous Post Next Post