कविता शिर्के यांच्या तीन कविता



स्थलांतरित स्त्रीच्या ज्या वेदना असतात, त्यांची जातकुळी वेगळी असते. म्हणजे, मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होऊन पुन्हा सगळं उभं करणं, नव्या भावविश्वाशी जुळवून घेत, तग धरत, घर - दार सावरत कवितेशी नाळ जोडणं हे तसं कठीण! मात्र; शिर्के यांचं जगणं आणि लिहिणं पाहिलं - वाचल्यावर लोक कुठंकुठल्या परिस्थितीत लिहितात हे कळते. कविता शिर्के ह्या मु.पो. केंदूर (थिटे आळी) जि. - पुणे येथे राहून जगण्याचा संघर्ष करत असतांना कविता लेखन करतात. शिर्के ह्या धरणग्रस्त भागातील आहेत. त्या विस्थापित आहेत. त्यामुळे आपुसकच त्यांच्या कवितेमध्ये - धरण बांधल्यानंतर  आपल्या गावा-मुळांपासून तुटल्याची  वेदना प्रकट होते. जिथे पिढ्यानपिढ्यांची वहिवाट राहिली, लहानपण गेलं,  त्या हाडीमासी रुजलेलं गाव कायमचं सोडून परागंद होत जाण्यातली वेदना, आपल्या राना माती पासून दूर होण्याची घुसमट आणि स्वत:च्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा गतकाळात शोधतांना मातीचाही बळी गेला, या विषण्ण भावनेसह एक बाई जेव्हा विस्थापित होते त्यावेळी नवीन ठिकाणी आपली मूळ घट्ट रुजावी म्हणून सर्व जाणिवांनी पूर्ण ताकतीनिशी प्रयत्न करते, आणि तरीही आपल्या मूळ खुणा शोधू पहाते, त्या जेव्हा सापडत नाहीत, तेव्हा मात्र कोलमडते. ही असहायता शिर्के यांनी नेमकेपणाने व्यक्त केलीय.


कवियत्री स्वतः धरणग्रस्त असून त्या स्त्री वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या कवितेत धरणग्रस्त लोक, स्त्री यांच्या दुःखाची शोकांत कहाणी आहे. अर्थात, या कवियत्रीचे जगणे आणि लिहिणे हे एकच आहे, यात दुमत नाही.  मात्र असं असलं तरीही या कवितेला अनेक कौटुंबिक - सामाजिक पदर आहेत. अर्थात, ग्रामीण जीवनातील व्यक्तींचे विशेषतः विस्थापित, स्त्री वर्गाचे  हे एकल प्रश्न असले तरी ते समूहकेंद्री आहेत. शिर्के ह्या काव्यलेखनासाठी पारंपरिक रंजनवादी शैली टाळून कल्पनारम्यतेला बगल देऊन थेट वास्तवाला आणि आशयाला भिडणारी चिंतनशील कविता लिहितात. पर्यावरणाचे आणि विस्थापनाचे अनेक विषय आपल्या अवती भोवती आहेत. विकास गोंडस शब्दाला भुलून माणूस पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. अक्राळ-विक्राळ सरकारी धोरणे, बेदरकारपणे होत असलेला पर्यावरणाचा विध्वंस अशा विषयांवर जागतिकीकरणा आधी जन्मलेली पिढी लिहिते.  मात्र, जागतिकीकरणाच्या आसपास जन्मलेली  लेखक-कवींंच्या पिढीला या महाकाय प्रकल्पचा लोकजीवनावर काय परिणाम होईल, हे कळत नाही. वा त्यांना ते समजून घेण्याची गरज वाटत नाही. मुळात पर्यावरणाविषयीची अनास्था दिसून येते. काहींनी हे विषय कवितेतून मांडले. मात्र; त्यांचं प्रमाण अल्पच ! शिर्के  ह्यांना पर्यावरणाचा शाश्वत विकास महत्वाचा वाटतो. त्यामुळेच 'धरणग्रस्त' हा त्यांच्या कवितेचा विषय झाला. अर्थात, या कवियत्रीच्या कवितेत धरणग्रस्तांची वाताहत- घुसमट तर आहेच, याशिवाय ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी असणाऱ्या शिर्के यांच्या कवितेत स्त्रीयांचं सनातन दुःख उमटतं. स्त्रियांच्या दुःखाचे असंख्य पदर  उलगडत बाईचं कोंडलेपण, पुरुषसत्ताक समाजातील मानसिकता  यावर शिर्के यांची कविता भाष्य करते. जीवनानुभवाच्या दृष्टीने शिर्के यांचं कविता लेखन विविधस्वरूपी असुन समकालाला आणि समकालातील प्रश्नांना संपूर्ण जाणिवे-नेणिवेसह भिडते.


- संपादक


१. मातीच्या खुणांचाही गेलाय बळी


नव्या गावच्या मातीतही
रुजावं वाटलं अनेकदा
घायाळ पक्षीणीगत
काळीज फाटलं अनेकदा
मुरमाड माती तुडवताना
शोधत राहिले
धरणाखाली गेलेल्या मातीच्या खुणा
पण कुठलेच लागेबंध जुळले नाहीत
क्षणभर थांबून
खाली वाकून पाहिलं तर
माझ्या पावलांना चिकटलेल्या 
रेताड मातीला 
मान वर करून
काहीतरी सांगायचं होतं


धरणाच्या आगीत माणसांप्रमाणेच
मातीच्या खुणांचाही गेलाय बळी
कोरड पडल्यागत व्याकुळ होऊन
कवितेच्या भोवऱ्यात गरगरताना 
का शोधतेस मला पुन्हा पुन्हा ?


बुडालेल्या गावातच गडप झाल्यात
माझ्या अस्तित्वाचा खुणा
आता जन्मभर
कितीही चालली तरी
उमटणार नाहीत
माझ्या सुरकुत्यांच्या खुणा
कुठल्याच धुळीवर



२. पाणवठे


कुठून कशाही बायका
शेंदीत असतात पाणी
पाणवठ्यावर गात असतात
आयुष्याची रडगाणी


तोल जाईल विहिरीत इतक्या
ओणव्या होतात बायका
तहान भागवणा-या ओंजळींना
मरणाची एवढी घाई का ?


विहिरीत किती पाणी असतं
कुणीही अदमास घेत नाही
बुडालेली कोणतीच बाई मग
तुकारामांची गाथा होत नाही


नाकातोंडात जाते तेव्हा
ओंजळभर पाणीही पूर होते
हळदीकुंकवाचे ताट
मग गुलाल अबीर होते


तीच घागर तोच पोहरा
साळोसाल शेंदते तहान
किती पाजलं पाणी तरी
बाई पायातली वहाण



३. काचा


मी न्याहाळत बसायचे
स्वतः ला आरश्यात
तेव्हा पाठीमागून
दोन बटबटीत डोळे
रोखायचे
माझ्या चारित्र्यावर


आरश्यातल्या पाऱ्यापेक्षा
डोळ्यातल्या काचेने
मी व्हायची रक्तबंबाळ
कुठे कुठे सर्वांगात
रुतून बसायच्या
त्या काचा


एक दिवशी
संशयावरून
त्याने तो आरसाच
फोडून टाकला


आता त्याने फोडलेल्या
आरशाच्या
तुकड्या तुकड्यात
मी पाहते 
माझ्या बाईपणाची
अखंड असंख्य रूपे
सुस्वरूप आणि
कुरूप ही


- कविता शिर्के

Previous Post Next Post