कैलास दौंड यांची अलीकडेच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली 'तुडवण' कादंबरी नुकतीच वाचली. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार परिसरात घडणारी ही एका कुटुंबाच्या दयनीय वाताहतीची मन हेलावून टाकणारी दुर्दैवी कहाणी. मुळात बीड जिल्हा म्हटलं, की शेतीसंबंधाने कायम दुष्काळ. ’इथं जगण्याची तीन नावं म्हणजे ‘बखाड, उन्हाळा आणि दुष्काळ’ असं लेखकाने पृष्ठ १९१ वर नमूद करून ठेवलेलं आहे. बखाड म्हणजे अल्पवृष्टी. त्यामुळेच कायम दुष्काळ. म्हणजे इथल्या लोकांच्या नशिबात बाराही महिने उन्हाळा. त्यामुळेच त्यांच्या दुःखाला पारावार राहत नाही. जगण्याच्या किमान अपेक्षाही इथं पूर्ण होत नाहीत. मुळात अवतीभोवती भव्य दिव्य प्रेरक असं काहीच नसल्याने अंगी बाळगलेली स्वप्नेही तशीच खुरटीच असतात. पण तीही पूर्ण करता येऊ नये एवढा दैवदुर्विलास नशिबी आलेल्या एका अतिसामान्य कुटुंबाची ही करूण कहाणी आहे. डि.एड. होऊन कुठेतरी शिक्षक म्हणून नोकरी करू. त्यामुळे घरच्यांच्या मुखात सुखाचे चार घास जातील, एवढी माफक अपेक्षा ठेवून नेमकं सीइटीत नापास झाल्यामुळे नारायणसह त्याच्या कुटुंबाची तीव्र स्वरूपाची ससेहोलपट होते. याला कोण जबाबदार आहे ? नियती, त्याची कर्तृत्वहिनता, परिस्थितीशरणता, मुर्दाड सभोवताल की कुटुंबाची पारंपरिक आर्थिक, सामाजिक दुर्बलता ?
महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत अनेक लाटा आल्या. वसंतदादा पाटलांच्या काळात खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस उघडण्यापासून ते अलीकडच्या डि.एड कॉलेजेसपर्यंत. त्या त्या प्रकारांच्या शिक्षणाची गरज किती ? आणि त्यासाठी महाराष्ट्रात किती खाजगी शाळा-कॉलेजेस हवी, याचे सूत्र कधीच पाळले गेले नाही. परिणामी शिक्षणमहर्षींच्या संख्येची सूज प्रचंड वाढत गेली. आणि बेकारांचे तांडेच्या तांडे बाहेर पडले. नारायणचं डि.एड. म्हटल्यावर ‘डि. एडवाल्यांचं आता काही खरं नाही' ही सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया स्वाभाविक अलीकडच्या काळात प्रगट होऊ लागली आहे. त्यात नारायणसारख्यांचा काही दोष नाही. नारायण शासकीय कोट्यातून डी. एड. झाला. त्याला खाजगी डी. एड. कॉलेजात तोंडफाड डोनेशन द्यायचं काम पडलं नाही. म्हणून त्याला त्याची फारशी खंत वाटत नाही. मात्र नंतर त्याने एका खाजगी शाळेत प्रयत्न केला तर डोळे डोनेशनचे आकडे अंगावर काटे आणणारे. कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्याचा पोरगा कुठून आणणार लाखो रूपये ? मग डि.एड. ची पुंगळी काय कामाची ? नारायणा, शोध मग पोटापाण्याचे इतर स्रोत. काय काय स्रोत ? तर जवळपास एखादं मोठं शहर ? जिथं एखाद्या दुकानात, दवाखान्यात रोजगार मिळेल ? ते नाही. एखादा साखर कारखाना ? नाव नका काढू. शासनाच्या मॅट्रिक – बारावीवाल्यांसाठी रोजगार संधी ? रामजाने. बीड म्हटलं की उसतोड कामगार. हा स्वस्त जॉब ? इथे या गावात तो प्रकार दिसत नाही. गाई-गुरं, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यातलं काही ? कोणं शेणंमुत करावं ? पाचही पैशाचं भांडवल ना लागता चमचेगिरी, हुजरेगिरी, लाळघोटेपणा करून किमान आला दिवस ढकलण्यास, आपले आंबटशौक पुरे करण्यास मदत करणारं दादा-भाऊंचं बदनाम राजकारण ? कोणी तसा दिसत नाही. किमान आटो, टेम्पो, गावात सकाळी अन संध्याकाळी येणारी एस टी उभी राहण्याची स्टॅंड वजा जागा, जिथे चार माणसं जमतात त्याठिकाणी आधीच असलेल्या हॉटेलच्या बाजूला पान टपरी, छोटं किराणा दुकान ? त्यासाठी आवश्यक भांडवल ? मग नारायणचं कसं होणार ? नारायणा, आता रे तू काय करणार ? स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतीत काम कर बाबा. छे छे ! अर्धवट शिकला अन सगळीकडूनच वाया गेला ना तो. गावालाच उच्च शिक्षणाचा, एम्पीएस्सी, युपीएस्सीचा किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा लळा नाही. नाही म्हणायला गावातला एकजण तेवढा पीएसआय झालेला. तो नोकरीनिमित्ताने दूर. त्याचा प्रेरणाप्रभाव क्षीण. तो गावातल्या बेकारांसाठी फ़ारसं काही करत नाही. स्वान्तसुखाय ही वृत्ती. मग खुरटा नारायण शोधतो खुरट्या प्रेरणा. गावातल्या कोणाच्यातरी टेम्पोवर मजुरीने कापूस तुडविण्याच्या कामापासून सुरूवात. नंतर चंदनतोड करणाऱ्या चोरट्यांचा संपर्कात. हे बरोबर नाही हे कळण्याइतपत बुद्धी शाबूत असल्याने त्याला फ़ाटा. डोक्यात मध्येच शाळा-शिक्षक होण्याचं वेड. संस्थेवाले ९-१० लाखांची मागणी करतात. तो घरी शेत विकून पैसा उभारण्याची गोष्ट काढतो. प्रस्ताव अमान्य. मग घरी राहायचेच नाही. शहर गाठायचं असं ठरवतो. त्यातून उल्हासनगरला कुण्या शेठच्या ट्रकवर ड्रायव्हरकी करणाऱ्या गावातल्या सुदाम्यासोबत क्लिनर म्हणून गमन. नारायणच्या आणि सभोतालच्या गावात ड्रायव्हरकी -क्लिनरकीची क्रेझ आहे असे दिसते. काही स्वतःचे ट्रक चालवितात. आमच्या एका पाहुण्यांचं गाव असंच आहे. ते ट्रकड्रायव्हरांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
नारायणाच्या नशिबात कुठेच स्थैर्य नाही. उल्हासनगर ते गाव ही दीर्घ पल्ल्याची अधून मधून तंगड्यातोड. कमाई रुपया. गमाई दीड रुपया. गावाकडे तरी काही सुख समाधान ? बहीण यमुनी दुश्मन असल्यासारखी. टोचून बोलणं. तुसडेपणानं वागणं. राधाक्का आई. तिची संसाराला ठिगळं लावण्याची सतत कसरत सुरू. बाप नवनाथतात्या. जवळच्या थोड्याफ़ार जमिनीवर त्याचा भारी जीव. यमुनीच्या लग्नापायी अडचणींमुळे शेत विकायची गोष्ट काढणाऱ्या गावातील मुखंडांच्या वाऱ्यालाही तो उभा राहत नाही. नशीब तिच्या लग्नात फ़ारसा खर्च येत नाही. मात्र नारायणच त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरतो. नवा जावई तुकारामच्या आग्रहावरून नारायणचं लग्न केल्या जाते. त्यातून एक तिढा निर्माण होतो. बायको गावाकडे आणि तो उल्हासनगरला. ह्या त्रांगड्यातून सुटका व्हावी म्हणून तो शेत विकून टेंपो घेण्याचा राधाक्काला आग्रह करतो. ती त्याला बळी पडते. नवनाथतात्याच्या माघारी अडीच एकर पाऊतकाच्या पट्टीचा ती सौदा करते. ही नवनाथतात्यासाठी सहन करण्यापलीकडची गोष्ट. वैतागून तो घर सोडून गायब होतो. कायमचा.
असतील शितं तर जमतील भुतं. मात्र काही भुतं अशी शितं निर्माण करण्यात वाकबगार असतात. तर काही आयती शितं खाण्यात. अशी भूतं वेळीच ओळखून त्यांपासून चार हात दूर राहण्यातलं व्यावहारिक शहाणपण अंगी असणं आवश्यक असते. नारायणचं घोडं नेमकं तिथेच पेंड खाते. इतकी सुमार बुद्धी असलेल्या सरळ स्वभावाच्या नारायणचा फ़ायदा घेणारे अवती भोवती लांडग्यांसारखे टपूनच असतात. त्यात बहीणजावई तुकारामसारखे अग्रेसर. तो असं का वागतो याचं विश्लेषण लेखक करत नाही. किंवा त्याचा तसा काही हेतू असतो हेही उघडपणे सांगितलं जात नाही. मात्र चाणाक्ष वाचकाला ते कळते. तुकारामसारखेच बाहेरचेही असतात. नारायन या सगळ्यांचा बळी ठरतो. परिणामी पुढील सारे व्यवहार अंगलट येऊन नारायण अक्षरशः आठ , साडे आठ लाखांनी नागवला जातो. पुन्हा मजूरी. पाऊतकाच्या पट्टीत नव्या मालकाच्या विहीर खोदण्याच्या कामात त्याचा लवकरच अंत होतो. जणू पाऊतकाच्या पट्टीने त्याचा बदला घेतला. त्याच्या पश्चात त्याच्या बायकोला मुलगा होतो. तो ती राधाक्काच्या हवाली करून निघून जाते. आधी नवरा गेला, नंतर नारायण. त्यामुळे हवालदिल झालेल्या राधाक्काला नारायणचा मुलगाच एक जगण्याचा आधार वाटतो. ती त्याला घेऊन गावातल्याच पण पुण्यात खानावळ चालवणाऱ्या एका मुलीसोबत स्वयंपाक करण्याच्या बोलीवर गाव सोडून जाते. येथे कादंबरी संपते.
नारायणसारख्या कमालीच्या व्यवहारिकदृष्ट्या अल्पदृष्टी माणसांचे काय होणार ? तेच, जे नारायणचे झाले. अशीही माणसे असतात का ? हा प्रश्न कोणाला पडेल. त्याचं उत्तर 'हो' असंच आहे. अशांना कादंबरीचा नायक म्हणावे का ? नायक म्हटले कसा भव्य, दिव्य, उदात्त, पराकोटीची स्वप्ने सत्यात उतरविणारा असतो. मग नारायण कसला नायक ? का नसावा ? माणसाची ही जातकुळीही वाचकांसमोर का येऊ नये ? दौंडांनी निश्चितच असा नारायण अवतीभोवती अनुभवला असणार. म्हणूनच तो कादंबरीतून उभा करण्याची प्रेरणा त्यांना झाली असावी. नारायणचे दुर्दैव असे की, त्याचा हा स्वभाव जाणून त्याची पाठराखण करण्यात ना राधाक्का कामी पडली, ना नवनाथतात्या. त्याच्यासाठी राधाक्काने नवनाथतात्याला ना सांगता शेत विकलं. पण ऩंतरच्या त्याच्या व्यवहारांत मात्र तिने लक्ष घातले नाही. ना त्यानेही तिला त्याबाबत विश्वासात घेतले. त्याला भरोसा वाटला मेहुना तुकाराम आणि गावातल्या संधीसाधूंचा. परिणाम ? संपूर्ण फ़सगत. इथे राधाक्काचे चुकले का ? नारायण कसा आहे हे तिला ओळखता आले नसेल का? कारण ती कधीच त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगताना दिसत नाही. नवरा घर सोडून गेला त्याचं फ़ारसं दुःख ती करत बसत नाही. नारायणचं मरणही जणू निर्विकारपणे स्वीकारते. ज्या पोटच्या नारायणला ती नीट समजून घेऊन वाढवू शकली नाही, ती मात्र त्याच्या मुलाचं भवितव्य घडविण्याच्या दीर्घ पल्ल्याच्या नव्या आव्हानाला स्वीकारते. तिच्या हातून नारायणच नीट घडला नाही. मग त्याचा मुलगा कसा घडेल हा मला पडलेला प्रश्न आहे.
लेखक काही गोष्टी गुढावस्थेत ठेवतो. एका रात्री नवनाथतात्या, यमुनीसह राधाक्का बाहेर अंगणात झोपलेले असता काही अज्ञात लोक तिला उचलून पलीकडे शेतात नेतात. तिचे घरही एकाट, शेतात आहे. ते लोक तिच्यावर बलात्कार करतात. पोलिस रिपोर्टमध्ये ही गोष्ट नमूद करण्यास ती विरोध करते. कारण काय तर यमुनीचे लग्न ठरलेले असते. त्यामुळे नसता बोभाटा नको असे तिला वाटते. पण प्रश्न असा की तिच्यावर का बलात्कार केला जातो ? ती काही कोवळी तरूणी वा गावात एकमेव सुंदर अशी बाई नाही. बरे कोणी सुडबुद्दीने तसे नीच कृत्य केले असे म्हणावे तर या कुटुंबाचा कोणाशीही वाद नाही. आणखी एक – असे प्रकार शेतात एकल घरे असणाऱ्यांच्या बाबतीत घडत आहेत असेही दिसत नाही. कारण तशा कुठल्याही प्रकाराची लेखक नोंद करत नाही. त्यामुळे नेमका हा प्रकार काय हे कळत नाही.
बीड जिल्ह्यात शिरूर भागात बोलली जाणारी या कादंबरीतली बोली आहे. तिच्यातले काही शब्द देण्याचा मोह आवरत नाही. लेखकाने शेवटी अवघड वाटणाऱ्या शब्दांचे अर्थ दिले हे सोयीचे झाले. आगाप –अगोदर, आगुठ –पावसाळ्यातील सुरूवातीचा मोठा पाऊस , आरदूळ - आवाज, उपराळा –विनाकारण वाढलेला उद्योग, ऊतफ़ेस –अधिक प्रमाणात असणे, ठायबसीचं - नियमित, तटक्यास –त्वरित, नेहर वखूत –न्याहरीची वेळ, मेघूट-ढग, रही-रांग, वायवाय –उलट्या, हेटा –टाकाऊ.
गावापासून दूर शेतात वास्तव्य करणाऱ्या एका निरूपद्रवी, काहीशा दुर्मुखलेल्या, अठराविश्वे दारिद्र्य हीच संपदा असणाऱ्या कुटुंबाची ही शोकांत कथा आहे. ती प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न लेखकाने कसोशीने केला आहे. म्हणूनच ‘पाणधुई, 'कापूसकाळ’नंतरची लेखकाची ही कादंबरी लक्षात राहील अशीच आहे. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठही न्याय देणारे आहे.
तुडवण (कादंबरी) / लेखक : कैलास दौंड
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
पृष्ठे : २४५/-
किंमत : ३००/-