मी लेखक म्हणून सतत कालानुरूप बदलत गेलो


अगदी सुरूवातीला म्हणजे १९६९ मध्ये एका रात्री मी दोन कविता आणि एक कथा लिहिली. पुढे कथा, कविता जवळपास १९९० पर्यंत सातत्याने लिहीत गेलो. पुढे कथा, कविता थोडी मागे पडली. कादंबरी लेखनाकडेच प्रामुख्याने वळलो. गेली पन्नास वर्षे हे सहजपणे घडत गेले. पण मग माझ्या हातून जे जे पुस्तकरूपाने प्रकाशित झाले फ़क्त तेवढेच घडले का ? तर नाही. अनेक कथा, कविता, कादंबऱ्या, लेख अजून पुस्तकरूपात प्रकाशित झाले नाहीत. अनेक वाङ्मयीन चळवळी येऊन गेल्या. तर कागद-पेन ही पारंपरिक लेखनपद्धती अलीकडच्या तंत्रक्षेत्राने मागं पडली. जुनी आकाशवाणी मागे पडली. टि.व्ही, मोबाइल, अन्ड्रॉइड, कॉम्प्युटर, टॅब्लेट, लॅपटॉप, मेल, फ़ाइल्स इत्यादि   साधनं आली. आता तर कोरोणाने माणसे परस्परांपासून  दुरावली. संमेलने, मेळावे भूतकाळात जमा झाले. गुगल चॅट, झुमद्वारा समूहसंपर्क सुरू झाला.  या सगळ्या टप्प्यांवर मी स्वतःला अपडेट ठेवण्याचा सदैव प्रयत्न करत आलो. त्यात यशही मिळत गेले.

कथा, कविता लिहिण्याच्या उमेदीच्या काळातच मी कृषी, गुरं यासारख्या शेतीभातींच्या  विषयांवर लेखन करीत होतो. कारण असं काही छापून आलं की मला विषेष आनंद होतं असे. पुढं लोकगीतं, लोकम्हणी यांचं संकलन करून त्यावरचे लेख छापून येत गेले. मला आठवते माझी मुलगी सौ. सविता हिच्या लग्नात मी असाच एक लोकगीतांवरचा लेख तिचे संदर्भ घेत अकोल्याच्या एका दैनिकात छापून घेतला होता. त्याच्या दोनशे प्रती लग्न मंडपात उपस्थित मंडळींना  वाटल्या होत्या. कविता अधिकाधिक छापून याव्यात यासाठी ‘शांती अरू’ हे टोपणनावही धारण केले होते. 'शांती अरू’ ह्या नावात अरू ही माझ्या सौ.च्या नावातील (अरूणा ) पहिली दोन अक्षरे होतं. शांती  आणि अरू यातून मला जे अपेक्षित होते ते असे –मी लग्न झाल्यानंतरच्या त्या काळात स्वभावाने अत्यंत रागीट होतो. अरूणा मात्र कमालीची संयमी, शांत. ती आयुष्यभर अशीच राहिली तरच आपल्या संसाराचा गाडा नीट शेवटास जाईल. आणि तो जावा ही भावना मनात धरून मी हे टोपणनाव धारण केले होते. मध्ये एकदोन वेळा काही स्पर्धा परीक्षांमध्ये जोड्या लावा या प्रश्नप्रकारात माझं हे टोपणनाव समाविष्ट झालं होतं. या नावाने त्याकाळी अनेक कविता प्रकाशित झाल्या. मात्र एकवेळ किशोर मासिकात याच नावाने प्रकाशित झालेल्या एका कवितेच्या मानधनाचा चेक माझ्या बॅंकेने नाकारल्यावर संपादकास तो परत करून माझ्या खऱ्या नावाने मागितला. पुढे हे टोपणनाव सोडले.

काही प्रवासवर्णने, काही साहित्य संमेलने, साहित्यिक मेळावे, अनुषंगिक वाङ्मयीन कार्यक्रम यांची वार्तांकने, लेख लिहून ती दैनिकांत छापून आणली. माझ्याविषयीच्या कथा-कवितांच्या पुरस्कार वा इतर विशेष बाबी असल्यास त्याची वृत्तेही दैनिकांना पाठवित असे. कै. ज्ञानेश पवार नावाचे एक कविगुरू मला महत्वाचा मंत्र देऊन गेले होते. तो म्हणजे ‘आपल्या टिऱ्या आपणच बडवायच्या.’ प्रसिद्धीच्या संदर्भातलं हे तंत्र मला फ़ार उपयोगी पडलं. आकाशवाणी नागपूरचे  बबन नाखले नावाचे कार्यक्रम अधिकारी होते. त्यांच्यामुळे त्याकाळी माझ्या अनेक कथा नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित झाल्या. पुढे माझी ‘हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर नाखलेंनी तिचे नाट्यीकरण करून ते सहा महिने दर सोमवारी सकाळी आठ वाजता सातत्याने प्रसारित केले. या दोन्हींचा परिणाम मी फ़ार दूरवर शहरी आणि ग्रामीण भागात कथा-कादंबरीलेखक म्हणून पोचलो. याचं एक बोलकं उदाहरण देतो. एकदा मला पुणे विद्यापीठात एका मराठी प्राध्यापक सेमिनारमध्ये माझ्या ‘हाल्या हाल्या..' या कादंबरीवर भाषण द्यायला डॉ. नागनाथ कोतापल्लेसरांनी निमंत्रण दिले होते. मी तेथे पोचलो तेव्हा तेथे डॉ. कृष्णा किंबहुनेसर भेटले. तेही आयोजक होते. ते म्हणाले, ’बाबाराव, मी तुमची ही कादंबरी आकाशवाणी नागपूरवरून ऐकली.' ते त्यावेळी बीड येथे राहत होते. आकाशवाणी तुम्हाला  किती दूर नेऊ शकते याचं ते उदाहरण होतं. या साताठ वर्षांपूर्वी अकोला आकासवाणी एफ़ एम ने माझ्याकडून ‘हाल्या हाल्या..’ चे क्रमशः वाचन करून घेऊन ते आतापर्यंत दोनदा प्रसारित केले आहे.

दलित साहित्य चळवळीचा परिणाम म्हणून ७० च्या दशकात ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, जनसाहित्य अशा विविध चळवळी उदयाला आल्या. स्वाभाविकपणे मी ग्रामीण साहित्य चळवळीकडे ओढला गेलो. तिथे फ़ायदा असा झाला की मला कथालेखनात योग्य दिशा मिळाली. दुसरी गोष्ट डॉ . आनंद यादव, डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी आयोजिलेल्या ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी' या  स्पर्धात्मक उपक्रमात माझ्या ‘हाल्या हल्या दुधू दे' या कादंबरीची निवड होऊन ती छापली गेली. तिनं मला फ़ार मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र मी कुठल्याही चळवळीत फ़ारसा बुडत गेलो नाही. परिणामी अनेक चळवळींनी मला आपलं मानलं.  

मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, विभागीय साहित्य संमलने, जिल्हा साहित्य संमेलने, विविध शाळा –महाविद्यालये अशा अनेक व्यासपीठांवरून आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिकवेळा कथाकथन केले आहे. अनुभव नसताना पहिले कथाकथन पुसद जिल्हा यवतमाळ येथे ७० च्या दशकात संपन्न झालेल्या अस्मितादर्श मेळाव्यात केले होते. आतापर्यंत अनेक साहित्य संमेलनांची अध्यक्षपदेही भूषविली आहेत ₹. त्यात धानोरा जि .गडचिरोली येथे १९-२१ डिसेंबर २००८ साली माझ्या अध्यक्षतेखाली झालेले ५८ वे विदर्भ साहित्य संमेलन महत्वाचे. शासनाचे पखाल (१९९५)आणि वारूळ(२००५) या कादंबर्यांना पुरस्कार प्राप्त झाले. शिवाय अनेक साहित्य संस्थांचे पुरस्कारही मिळाले. शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही २००२ मध्ये मिळाला.

मी काही लेखमालाही लिहिल्या आहेत.  त्यात ‘ना सुराळ ना धुरजड’ -दै. मातृभूमी-अकोला, ’वाटा-आडवाटा’-सा. महाराष्ट्र-औरंगाबाद (या लेखमालिकेची नंतर ‘दंश’ नावाची कादंबरी प्रकाशित झाली ), ‘हाड रे हाड’ ही कथामाला -सा. राहूल-आदित्य, वाशीम आणि वाशीम येथून प्रकाशित होणाऱ्या ‘काव्याग्रह' मासिकामध्ये शब्द-शिवार ह्या सदराखाली महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि नवोदित कवींच्या कवितासंग्रहांवर विस्तृत असे समीक्षालेख लिहिले. शिवाय असे अनेक  कवितासंग्रह, कथासंग्रह ,कादंबर्या,आत्मचरित्रे यावरील समीक्षालेख दै. महाराष्ट्र टाईम्ससह  महाराष्ट्रभरातील कित्येक नियत-अनियतकालिकांतून प्रकाशित झाले.  डॉ.विठ्ठल वाघांसाठी ४५० पेक्षा अधिक वऱ्हाडी म्हणींचे शालेय विद्यार्थ्यांकडून संकलन केले. शिवाय जवळपास पाऊशे नवोदितांच्या पुस्तकांना प्रस्तावना, पाठराखण दिलेल्या आहेत.

नवी टेक्नॉलॉजी २००२ नंतर झपाट्याने पुढे आली. तिचा माझ्या बाबतीतला पहिला अविष्कार म्हणजे २००६ साली मी घेतलेला साधा मोबाइल. २०११ मध्ये टॅबलेट घेतला. फ़ेसबूक, व्हाट्सप हाताशी आले. या दोन्ही माध्यमांवर पोस्ट्स टाकून व्यक्त होऊ लागलो. लाइक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पडू लागला. तसा हुरूप वाढत गेला. आणि मी टेक्नोसॅव्ही झालो. या दोन्ही माध्यमांतून नव्या पिढीशी व्हर्च्युअल  संपर्क वाढला. त्यात मग स्वतःचा ब्लॉग सुरू केला. त्यावर सातत्याने व्यक्त होऊ  लागलो. आजरोजी त्यावर ६३७ पोस्ट्स आहेत. त्यात माझ्या सर्व पुस्तकांवरचे समीक्षालेख समाविष्ट केले आहेत. त्यामुळे माझ्या साहित्यावर एम फ़िल (१५ पेक्षा अधिक) आणि पीएच. डी. करणाऱ्यांची (सहाजण आवर्डी. अजून किमान आठजण प्रतिक्षेत.) आणि इतर अभ्यासक, प्राध्यापक विद्यार्थ्यांची सोय झाली. मध्यंतरी एक वेबसाइटही सुरू केली होती. पण ती बंद पडली. टॅबलेटवरूनच एक व्हाट्सप किंवा मेसेंजरचा फ़ॉर्म वापरून ‘सुब्बी : द व्हर्च्युअल गर्ल' नावाची जवळपास ३५० पेजेसपेक्षा अधिक पेजेसची कादंबरी लिहून एका प्रकाशाला पाठविली. एक टिनएज तरूणी आणि एक ओल्डेज लेखक या दोघांमधला सेक्ससह सर्व सध्यकालीन विषयांवरचा तो मुक्त संवाद आहे. ते माझे पहिले डिजीटल कादंबरी लेखन. (ही कादंबरी त्या प्रकाशकाकडून परत आली ल. दुसरा कोणी भेटला तर त्याला द्यायची आहे.) ‘दुःखाचे अभंग ‘, ’रानीवनी' अशा काही मालिकाही यासमाजमाध्यमांवर सादर केल्या. त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘झुंड' नावाची कादंबरी, एक प्रवासवर्णन आणि आत्मचरित्रपर लेख सध्या लॅपटॉपवर टायपत आहे. अलीकडे २०१८ मध्ये टॅबलेट खराब झाल्यावर एक ॲन्ड्राइड अन एक  लॅपटॉप घेतला. आता कविता, लेख, कथा, कादंबऱ्या वा इतर जे काही लिहायचे ते सारे लॅपटॉपवरच लिहितो. आता घरात कागद, पेन फ़क्त दर महिन्याचा किराणा आणण्यासाठी वाणसामानाची यादी करण्यापुरताच वापरतो. कोणतेही साहित्य वा इतर कोणत्याही बाबातीतला व्यवहार मेलद्वारा करतो. गेली कित्येक वर्षे पत्रे, पाकिटे यासाठी पोष्टात गेलो नाही. सारांश ‘नो कागद नो शाई, आता ओन्ली टेक्नोसॅव्ही' हा माझा मंत्र झाला आहे.

एक सांगायचं ६९ व्या वर्षी कार चालवायला शिकलो. एक जुनी मारोती अल्टो विकत घेतली. तिने आता सौ. अरूणा  आणि मी गावे फ़िरतो. एरव्ही लोक पासष्टीनंतर कार चालविणे बंद करतात. अन मी ? 

शेवटचा मुद्दा. कोरोणा आला. अन् त्याने सर्व जगाच्या नसा आवळल्या. सगळं जग लॉकडाऊनमध्ये गेलं. माणसाला माणसाची भीती उत्पन्न झाली.   आधी सगळेच भांबावले. संवादच खंडित झाला. पण त्यालाही पर्याय आले. डिजीटल कन्व्हर्सेशन. ऑडिओ, व्हिडिओ हे तर आधी होतंच. फ़ेसबूक पेज, गुगल मीट, झूम ही नवी साधनं आली. या काळात सुरूवातीलाच मी ‘माझ्या लहानपणीचे गाव' ही ४६ व्हिडिओंची मालिका बनविली. तिला यूट्यूब, फ़ेसबूक, व्हाट्सपवरून खूप प्रतिसाद मिळाला. मग माझ्या ‘इथे पेटली माणूसगात्रे' या कवितासंग्रहातील कवितांचे विडिओ तयार करून यूट्यूबवर टाकले. अलीकडे तीन चार वेगवेगळ्या साहित्यसंस्थांच्या फ़ेसबूक पेजवरून व्यक्त झालो. तीन  गुगल मीटवरून वर्ग सहावीच्या बालभारती पुस्तकातील ‘बाकी वीस रुपयांचं काय ?’ ह्या माझ्या पाठासंदर्भात त्या शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हो, अगदीच शेवटचं बरं का हे. माझा एक माजी विद्यार्थी किशोर कांबळे याने ‘साजना' नावाचा मराठी सिनेमा काढला. त्यात मी लिहिलेले ‘साजना सांग ना, मी तुझी रे साजना' हे गीत समाविष्ट केले आहे. ते गीत दमदार स्वर आणि संगीतात बद्ध केले आहे.  अवश्य ऐका.

- बाबाराव मुसळे

(लेखक हे मराठीतील ख्यातनाम कादंबरी आहेत)

Previous Post Next Post