डॉ. बाळासाहेब लबडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली 'पिपिलिका मुक्तिधाम' ही कादंबरी हाती पडली. राजू बाविस्कर यांच्या कुंचल्यातून चितारलेल्या चित्तवेधक चित्रापासून व शिर्षकापासून अगदी अक्षरन् अक्षर वाचावयास सुरुवात केली. 'पिपिलिका मुक्तिधाम' ही कादंबरी म्हणजे माणसाचे वैचारिक मुक्तीधाम आहे, हे सहज लक्षात येते. ही कादंबरी मुंगी या य:कश्र्चित प्राण्याच्या रुपकाद्वारे व्यक्त होते. 'पिपिलिका मुक्तीधाम' ही कादंबरी प्रतिकात्मक आणि रूपकात्मक आहे. दुर्बोध अशा प्रतिमांनी भरलेले मनुष्यजीवन, रंजले नि गंजलेले मनुष्यजीवन, अनेकरंगी - अनेकढंगी छंदी माणसे, कर्ती माणसे व भारलेले मनुष्यजीवन, गतीमध्ये स्थिती शोधावी की स्थितीमध्ये गतीचा शोध घ्यावा, अशा संभ्रमात सापडलेले मनुष्य जीवन, हे सारे एका बहुरंगी कोलाजद्वारे प्रकट करून दाखविण्याचे अत्यंत कठीण काम 'पिपिलिका मुक्तीधाम' ही कादंबरी करते.
या कादंबरीत चार बेकार तरूण आहेत. ते दररोज हातावर पोट भरणारे आहेत. ते अल्पशिक्षित पण चांगले वाचक आहेत. त्यांचा गुरू हा एक देवीचा भक्त पोतराज आहे. तो जुन्या लोककथा सांगत राहतो. लोककथा त्या चौघांच्या अंगात भिनत जातात. पण त्या लोककथा ह्या नव्या आहेत. आजच्या काळाच्या संदर्भात आहेत. पोतराज म्हणजे, धुतरी हि त्या सांगत राहते. त्याचे नवीन नवीन अर्थ हे लागत जातात. समकालिन तरूणांची व्यथा यातून येते. सख्या, लाल्या, दिलप्या आणि कामकरी निवेदक अशा या चौघांना सामाजिक वास्तवाने अस्वस्थता येते. बेकारी असेल अशावेळी ते निराश होतात. निराश झाले की, ते खोल निराशेच्या गर्तेत जातात आणि आपण मुंग्या झाल्यासारखे त्यांना वाटते. मग चार मुंग्यांचा जन्म होतो. काळी, लाली, तांबडी, आणि कामकरी मुंगी. ह्या मुंग्या आपल्या बेकारीने त्रस्त असल्याने त्या सतत कामाच्या शोधात असतात आणि त्यांच्या मनातील उद्गिग्नता त्या बोलत राहतात. मग ही कादंबरी लयबद्ध व्यक्त होत राहते. त्या आपल्या मुक्तीचा मार्ग शोधत राहतात. त्यासाठी त्या परकाय प्रवेश करून आपल्या जीवनातील विविध धर्माचे तत्त्वज्ञान लावून समजुन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात असलेली अस्वस्थता शेवटी कमी होते. त्यांना बऱ्याच गोष्टी ज्ञात होत जातात, असे कादंबरीचे कथानक आहे. कादंबरीचे कथानक विलक्षण आहे. ही कादंबरी वाचतांना वाचकाची वैचारिक, भावनिक, आंतरीक, मनाची घुसळण आहे. लेखकाच्या कलात्मक जाणिवेतून आणि प्रदीर्घ चिंतनातून आलेली ही कादंबरी आकाराला आलेली आहे.
अध्यात्मिक दृष्ट्या यात सर्व तत्वज्ञान मुक्तीच्या दृष्टीने आले आहे. 'कोसला' त्या काळात आवडली, आजच्या काळात लबडे यांची 'पिपिलिका मुक्तीधाम' आवडली. प्रस्तुत कादंबरी निर्गुण- निराकार आत्म्याचे सगुण साकार रूप आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अर्थात याची प्रचिती कादंबरी वाचून झाल्यावर अधिक अधिक प्रकर्षाने मनाला भिडेल याची खात्री आहे. सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता ह्या चार मुक्ती म्हणून परमार्थात मान्यता पावल्या आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात सलोकता, समीपता, सरूपता ह्या तीनही भुक्ती असून त्यांच्या प्राप्तीसाठी आज मनुष्य आपली युक्ती, बुद्धी आणि शहाणपण अक्षरशः पणाला लावत आहे, हे वास्तव आहे. मानवाच्या वृत्तींकडे सुक्ष्मदृष्टीने व अलिप्तपणे पाहण्यासाठी प्रस्तुत कादंबरी मुंगी प्राण्याच्या माध्यमातून भाष्य करते. लबडे यांचा हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे.
कादंबरीची धाटणी हटके आहे. निवेदनाचा पोत हा वैविध्यतेतून आकारास येतो. नव्या निवेदन पद्धतीची शैली विकसित करणारी ही कादंबरी कादंबरी साहित्य प्रकारचा पारंपरिक पोत नाकारून एक नवा आकृतिबंध निर्माण करते. मुंग्याच्या रूपक वापरून आकारास येणारी ही कादंबरी वास्तवाचा शोध घेते.
आज माणसाला धावपळीच्या जीवनात संध्याकाळी घरी येऊन चार घटका विश्रांती मिळाली तरी सायुज्यता मुक्ति मिळाल्याचे समाधान त्याला लागते. अशा परिस्थितीचा लेखाजोखा हा अगदी सामान्य विषयापासून असामान्य विषयांपर्यंत कादंबरीत मांडलेला आहे. मुंगी घर ते उद्योगव्यवसाय आणि उद्योगव्यवसाय ते घर यातच सतत कार्यरत असते आणि त्यातच आपल्या जीवनाची सार्थकता मानत असते. मनुष्याचे वेगळेपण असे की, ह्या संसारी धावपळीत त्याला आपले कोणीतरी कौतुक करावे, आपल्या कामाला लोक मान्यता मिळावी, आपण आपल्या प्रिय तसेच आदरनिय व्यक्तीच्या जवळपास असावे किंवा आपण आपल्यापेक्षा श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या श्रीमंतीचे थोडेतरी अनुकरण करावे, लोकांनी आपल्याला ऐकावे, लोकांनी आपल्याला मान द्यावा, इत्यादी इत्यादी म्हणजेच मनुष्य सलोकता, समीपता यात गुरफटलेला आहे. सायुज्यता मुक्ती म्हणजे काय ? हा साधा विचारही मनात येत नाही. व्यावहारिक विश्वात कामात बदल म्हणजे विश्रांती. एका कामातून सुटका दुसऱ्या कामास प्रारंभ. कामावरून घरी येणे म्हणजे व्यवसाय नोकरीतून मुक्ती आणि घरगुती कामात गुंतणे घरच्या कामातून मुक्ती मिळणे म्हणजे व्यवसाय नोकरीत गुंतणे. कोणताही शेतकरी देखील घर आणि शेती असा कामात आदला बदल करून आपले आयुष्य व्यतीत करत असतो. हाऊसवाइफ अर्थात गृहिणीची सायुज्य मुक्ती याचा अर्थ मोकळे होणे म्हणजे मनुष्याला मोकळे व्हायला नको त्याला काहीही करायला मोकळेपणा हवा आहे. त्याला खऱ्या अर्थाने मुक्ती नकोय. त्याला मोकाट संचार हवाय. शेवटी 'उंबरातले किडे मकोडे उंबरी करिती लिला' हेच खरे ! ही कादंबरी म्हणजे मुक्तीवरचे एक प्रचंड भाष्य आहे आणि ते प्रभाविपणे उतरलेले आहे. मानवी मुक्ती विषयक दृष्टिकोन इतक्या विस्तृत कॅनव्हासवर लेखकाने रेखाटला. त्यासाठी लागणारा संयम हा लेखकाकडे आहे. कादंबरीचा पट हा व्यापक आहे. आवश्यकता आहे ति मनोभूमिका समजुन घेण्याची. कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येते की, केवळ करमणूक म्हणून लेखनाने तीनशे अठ्ठयाहत्तर पाने लिहीलेली नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, जीवन हे व्यापक पटावर लेखकाने रेखाटले आहे. कादंबरीच्या आकृतिबंधात आपण पिपिलिका मार्गे विश्वाचा परम अर्थ जाणून घेण्याचा व त्यातून जे जे आकलन झाले ते सर्व व्यक्त करण्यासाठी लबडेंनी जो शब्दसंभार मराठी सारस्वताच्या प्रांगणात उभा केला आहे तो एकमेवाद्वितिय आहे.
सर्व धर्म, पंथ, मार्ग, भक्तिज्ञान ह्या साऱ्यांचा केंद्रबिंदु माणुस आहे. जो ह्या चराचर सृष्टीत सर्वात शेवटी अवतीर्ण झाला आहे. हे सर्वमान्य आहे ८३,९९,९९९ योनी पैकी कुणालाही जे शक्य झाले नाही ते मानवाला व केवळ मानवाला शक्य झाले.. हवा, पाणी, अन्न ,वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्याने आपला आचार, आहार व विहार ह्या सर्वाची एक वैचारिक आचार संहिता निर्माण केली ती पुढे प्रत्येक पीढित संक्रांतही करुन आपल्या देहाच्या गरजा आवडी निवड़ी पूर्ण करुन घेतल्या खऱ्या पण इतके करूनही त्याच्या अन्तःकरण मन बुद्धी चित्त व अहंकार ह्या मानसिक पातळ्याना समाधान मिळत नव्हते. मानवाची शारिर-मानस अवस्था व व्यवस्था असमाधानी अपुरी ठेवल्याने प्रत्यक्ष ईश्वराला जे शक्य झाले नाही ते आत्मचिंतन करण्याचे कार्य व तसे आंतरिक सामर्थ्य मानवाला प्रदान केले असावे. जीव सृष्टितील प्रत्येक जिवाची स्वतःची अशी संवाद भाषा आहे. त्यात शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध ह्या संवेदनाद्वारे प्रत्येक जीव आपापल्या जातीधर्मात संवाद, साद व प्रतिसाद यांचे आदान प्रदान करीत असतो. मनुष्य प्राण्याचे वेगळे पण हेच की तो कल्पना विलास करू शकतो. ह्या कल्पनाविलासाद्वारे सृष्टी निर्मितीचे व त्यातील वैविध्यांचे गूढ़ ह्या बद्दल मनुष्य वेगवेगळे सिद्धान्त मांडू लागला. जिथे जिथे मानवाचे वास्तव्य स्थिर झाले तेथील उपलब्ध पर्यावरणानुसार त्याला जे जीवनानुभव आले ते जो तो मांडत गेला. माणसाने आपल्या निरीक्षण, परीक्षण क्षमतेला बुद्धी व कल्पना यांची जोड़ देवून १४ विद्या व ६४ कला आत्मसात करुन घेतल्या, ज्यातुन काव्य शास्त्र व विनोदा द्वारे साहित्य निर्माण झाले. साहित्यिक, कवी, नाटककार, कादंबरीकार निर्माण झाले... अशी ही अती दीर्घ परंपरा लाभलेल्या कलेतुन लबडे यांनी 'पिपिलिका मुक्तीधाम' ही कलाकृती सादर केली आहे. चरक सुश्रुत महाभागानी आत्म चिंतनातून शरीराच्या अंतर्गत भागावर विश्लेषण करणाऱ्या संहिता लिहिल्या ज्या आजही शास्त्र मान्य आहेत. लेखकाने मुंगीचे रूप धारण करुन आकाशासह मानवी व्यक्ति- प्रकृती -स्वभाव यांचे देश- काल- व्यक्ति व परिस्थितिजन्य विश्लेषण करण्याचा अत्यंत यशस्वी असा प्रयत्न केला आहे.
मुंगी होवून साखर खाणे हा तर तिचा स्वभावधर्मच आहे. मुंगीने आकाशात उडून प्रत्यक्ष सूर्याला गिळणे ही दिव्य कल्पना केवळ ज्ञानेश्वर माऊलीच मांडू शकली. लेखकाने हा दिव्य वारसा घेऊन मानवी तात्विक धार्मिक, पारमार्थिक, सामाजिक, अशा अनेक विषयांचा उभा आडवा छेद घेण्याचा क्रांतिकारक प्रयत्न केला आहे. तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. लेखकाने जी जी सृष्टी पाहिली, अनुभवली व कल्पिली ती सर्व 'पिपिलिका मुक्तीधाम' ह्या कादंबरीत वैशिष्ट्यपूर्ण भाषेतुन प्रकट झाली आहे. कोसलानंतर ही कादंबरी साहित्य विश्वात ही कादंबरी चर्चिली जाईल, असे वाटते.
- दिवाकर वैशंपायन
पुस्तक - पिपिलिका मुक्तिधाम
लेखक - प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे
प्रकाशक - ग्रंथाली प्रकाशन, ठाणे
पृष्ठे - ३७८
मूल्य - ५००/-